kalyan

कल्याण-डोंबिवलीकरांनो पाणी जपून वापरा!…

Kalyan – कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने शहरात पुन्हा पाणी कपात लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या गुरुवारी, १९ नोव्हेंबर २०२६ रोजी रात्री १२ वाजल्यापासून शुक्रवार, २० नोव्हेंबर रोजी रात्री १२ वाजेपर्यंत म्हणजेच सलग २४ तास संपूर्ण पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.

अल निनोच्या प्रभावामुळे यंदा पर्जन्यमानात घट झाली असून, त्याचा परिणाम पुढील वर्षापर्यंत कायम राहण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने उपलब्ध जलसाठ्याचे काटकसरीने नियोजन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार केडीएमसीने हा निर्णय घेतला आहे.

यासंदर्भात केडीएमसीने एक परिपत्रक जारी केले आहे. त्यात असे म्हंटले आहे कि, महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागाने कळविल्यानुसार या वर्षी अल निनोच्या प्रभावामुळे पर्जन्यमानात झालेली घट व अल निनोचा प्रभाव पुढील वर्षीपर्यंत राहणार असल्याने राज्यातील जलसाठयाचे दि.३१/०८/२०२७ पर्यंत काटकसरीने, प्राधान्यक्रमाने व नियोजनबध्द पध्दतीने व्यवस्थापन करुन पिण्याच्या पाण्याची सुरक्षितता निश्चित करण्याबाबत शासन निर्णय निर्गमित केला असून संभाव्य दुष्काळसदृष्य परिस्थितीचा प्रभाव कमी करण्यासाठी पूर्वतयारीच्या उपाययोजना व उपलब्ध जलसाठयाचे दि.३१/०८/२०२७ पर्यंत नियोजन करणेबाबत सूचना दिलेल्या आहेत. धरणातील उपलब्ध पाणीसाठ्याचे दि.३१ ऑगस्ट, २०२७ पर्यंत योग्य नियोजन करता यावे यासाठी शासन निर्णयाप्रमाणे कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रामध्ये पाणी कपात करण्याचे ठरले आहे.

त्यामुळे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या बारावे, मोहिली, नेतिवली व टिटवाळा जलशुध्दीकरण केंद्रामधून कल्याण (पूर्व/पश्चिम), कल्याण ग्रामिण विभाग (मांडा टिटवाळा, वडवली, आआंबिवली, शहाड, अटाळी व कल्याण ग्रामिण विभागातील इतर गावे) व डोंबिवली (पूर्व/पश्चिम) परिसरास होणारा पाणी पुरवठा गुरुवार दि.१९/११/२०२६ रोजी रात्री १२.०० ते शुकवार दि.२०/११/२०२६ रोजी रात्री १२.०० वाजेपर्यंत (२४ तासाकरीता) पाणी पुरवठा बंद राहील. तसेच पुढील सूचना मिळेपर्यंत आठवडयातील दर गुरुवारी रात्री १२.०० ते शुकवार रात्री १२.०० वाजेपर्यंत (२४ तासाकरीता) पाणी पुरवठा बंद राहणार आहे. तसेच पाणी पुरवठा बंद असलेल्या दिवशी व दुसऱ्या दिवशी महापालिकेमार्फत टँकरव्दारे पाणी पुरवठा केला जाणार नाही.

तरी सदर परिसरातील नागरिकांनी पाण्याचा आवश्यक तितकाच पाणी साठा करुन महानगरपालिकेस सहकार्य करावे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page