kalyan

KDMC चे सहाय्यक आयुक्त जयवंत चौधरी निलंबित…

kalyan – कल्याण-डोंबिवली महानगरपालिका हद्दीतील टिटवाळा आणि आंबिवली परिसरात सुरू असलेल्या बेकायदा बांधकामांवर नियंत्रण ठेवण्याऐवजी अशा बांधकामांना संरक्षण देण्यासह कारवाई करण्यात कसूरी केल्याच्या कारणावरून महापालिकेच्या ४/अ प्रभाग क्षेत्राचे सहाय्यक आयुक्त जयवंत चौधरी यांना निलंबित करण्यात आले आहे. महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी या संदर्भात निलंबन आदेश जारी केला आहे.

माहितीनुसार, टिटवाळा आंबिवली परिसरात १००० पेक्षा जास्त बेकायदा चाळींची उभारणी सुरू असल्याचा मुद्दा विधानपरिषदेत उपस्थित करण्यात आला होता. या परिसरात वडवली, मोहने, बल्याणी, उंभार्णी, मांडा येथेही मोठ्या प्रमाणात खासगी आणि सरकारी जागांवर बेकायदा बांधकामे झाल्याची तक्रार करण्यात आली होती.

एका खोलीची किंमत ६ लाख रूपये असल्याचे सांगून समाज माध्यमांवर या चाळींतील खोल्यांच्या विक्रीची जाहिरातही केली जात असल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले होते. तसेच या बेकायदा चाळींमध्ये गटारी, रस्ते, पाणी व्यवस्था यांसारख्या मुलभूत सुविधा नाहीत. या भागाचे प्रभाग क्षेत्र सहाय्यक आयुक्त जयवंत चौधरी यांना याबाबत माहिती असूनही आर्थिक हितसंबंधांपोटी दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करण्यात आला होता. तसेच बेकायदा बांधकामांसाठी जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणीही करण्यात आली होती.

त्यानुसार, आयुक्त अभिनव गोयल यांनी आयुक्त जयवंत चौधरी यांना निलंबित केले आहे.

दरम्यान, केडीएमसीच्या ‘ग’ प्रभाग क्षेत्रातील (डोंबिवली विभाग) प्रभाग अधिकारी जयराम शिंदे यांच्या वॉर्डमध्ये सुट्टीचा दिवस बघून, काही राजकीय नगरसेवकाच्या आशीर्वादाने काही गुंड प्रवृत्तीचे लोक प्रशासनाच्या नजरेत धूळ फेकून अनधिकृत बांधकाम करत आहेत.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, आयरे गावात सरस्वती विद्यालयाच्या पाठीमागे राहुल रॉय आणि सरस्वती विद्यालयाच्या पुढे जयेश म्हात्रे यांचे अनधिकृत चाळी (रूम) आणि गाळे बांधकाम झालेले दिसत आहेत.

सदर बांधकामाची तक्रार केली असता, केडीएमसी प्रशासनाला पोलीस बंदोबस्त मिळत नसल्याची माहिती मिळते. सदर बिल्डरांची पोलीस प्रशासनासोबत उठ-बस असल्यामुळे पोलीस बंदोबस्त मिळत नाही अशी माहिती आमच्या प्रतिनिधीला मिळाली आहे.

त्यामुळे केडीएमसी आयुक्त अभिनव गोयल ‘ग’ प्रभाग क्षेत्र डोंबिवली विभाग याकडे लक्ष देतील का?

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page