अवैधरित्या सुरु असलेले जीन्स वॉशिंग कारखाने बंद करा – मनोज गिरी…

kalyan – कल्याण डोंबिवली महानगरपालिका हद्दीत ९/आय प्रभाग मधील सरकारी जागेवर अवैधरित्या कब्जा करून सुरू असलेले जीन्स वॉशिंग कारखाने बंद करण्यात यावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते मनोज गिरी यांनी केली आहे. यासंदर्भात मनोज गिरी यांनी केडीएमसी ९/आय प्रभाग कार्यालयात विनंती अर्ज केला आहे.
९/आय प्रभागातील माणेरे वसार गावा लगत सुकाल्याचा तलावा जवळ तसेच नाल्या लगत अनेक अनधिकृत जीन्स वॉशिंग कारखाने सरकारी जागेवर सुरु आहेत. या सरकारी जागेवर अवैधरित्या कब्जा करून सुरू असलेल्या बांधकामाची पाहणी करून व नागरिकांच्या आरोग्यास अपायकारक असे जीन्स वॉशिंग कारखाने बंद करावेत.
या कारखान्यामधून बाहेर पडणारे पाणी हे जवळच असलेल्या शेतात जाऊन नुकसान होत आहे. या घाणेरड्या पाण्यावर पीक, पालेभाज्या उगवत आहे. त्यामुळे पर्यायाने मानवी आरोग्यासही धोका निर्माण होत आहे. याची गंभीर दखल घेऊनच महापालिकेने हे कारखाने तात्काळ बंद करावे अशी मागणी मनोज गिरी यांनी केली आहे.

दरम्यान, हे जीन्स वॉशिंग कारखाने ९/आय प्रभागात चालवण्यासाठी कोणी परवानगी दिली? सहाय्यक आयुक्तांच्या परवानगीने हे कारखाने सुरु आहेत का? तसेच हे कारखाने केडीएमसी आयुक्त यांच्या संमतीने हे सुरु आहेत का? अशी चर्चा नागरिकांमध्ये सुरु आहे. असे कारखाने सुरु होतात तेव्हा याकडे केडीएमसी दुर्लक्ष का करते? याची कायदेशीर चौकशी होणे गरजेचे आहे.



