५५७ कुटुंबांना मिळाली हक्काची घरे…

Mumbai – बीडीडी चाळींसह विविध पुनर्विकास प्रकल्पांच्या माध्यमातून मूळ मुंबईकर आणि दीर्घकाळापासून शहरात वास्तव्यास असलेल्या नागरिकांना त्याच ठिकाणी मोठे, प्रशस्त व हक्काचे घर देण्यासाठी राज्य शासन काम करत आहे. मुंबईची संस्कृती जपणाऱ्यांना घर दिल्याचं समाधान असून मूळ मुंबईकरांना मुंबईतून हद्दपार होऊ देणार नाही, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) ना. म. जोशी मार्ग-लोअर परळ येथील बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात पूर्ण झालेल्या तीन पुनर्वसन इमारतींमधील ५५७ पात्र रहिवाशांना सदनिकांचे चावी वितरण करण्यात आले. मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरुपात अकरा रहिवाशांना चावी व ताबा पत्राचे वाटप करण्यात आले.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, बीडीडी चाळींचा पुनर्विकास खासगी विकासकांऐवजी म्हाडामार्फत करण्याचा निर्णय शासनाने घेतल्यामुळे आशियातील नागरी पुनरुत्थानाचा हा सर्वांत मोठा प्रकल्प प्रत्यक्षात येत आहे. मुंबईची संस्कृती जपणाऱ्या चाळकऱ्यांना दर्जेदार घरे देताना नफा मिळविणे हा शासनाचा उद्देश नसून, अधिकाधिक सुविधा उपलब्ध करून देण्याला प्राधान्य आहे.
नव्या सदनिकांमध्ये बैठक खोली, दोन शयनकक्ष आणि आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात येत असून, रहिवाशांच्या कुटुंबांच्या पुढील पिढ्यांसाठीही ही घरे भक्कम आधार ठरतील, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.



