मीनाक्षी शिंदे यांनी महिला आघाडी प्रमुख पदाचा दिला राजीनामा…

Thane – मीनाक्षी शिंदे यांनी ठाणे जिल्हा महिला आघाडी प्रमुख पदाचा राजीनामा दिला आहे. मीनाक्षी शिंदे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सदर राजीनामा सुपूर्द केला आहे. या पत्रात मी ठाणे जिल्हा महिला आघाडी प्रमुख पदाचा राजीनामा देत आहे, असे सांगितले. तसेच माझ्या मनाला प्रचंड वेदना होतायत, अशा भावनाही त्यांनी व्यक्त केल्या.
गेल्या काही दिवसांपासून ठाण्यात प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. तसेच या प्रकरणात मीनाक्षी शिंदे आणि त्यांचे पती राजेंद्र शिंदे यांचा सहभाग असून, त्यांच्या अटकेची मागणी जोर धरत आहे. आणि यानंतरच मीनाक्षी शिंदे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

मीनाक्षी शिंदे यांचे राजीनामा पत्र…
गेल्या काही दिवसांपासून समाजमाध्यमांवर तसेच पक्षपातळीवर माझ्याबाबत सुरू असलेले आरोप-प्रत्यारोप व सर्वपक्षीय एकत्रित येऊन माझ्यावर विविध आरोप करत पक्ष नेतृत्वास अर्थात मुख्य नेते व पालकमंत्री म्हणून आपणास वेठीस धरण्याचे जे षडयंत्र चालू आहे हे पाहून माझ्या मनाला प्रचंड वेदना होत आहेत.
मी आजवर संपूर्ण निष्ठेने पक्षाचे काम केले. पक्षाला किंवा आपणांस कधीही मान खाली घालावी लागेल, असे कोणतेही कृत्य केले नाही. तरीही, ज्या प्रकरणांशी माझा काहीही संबंध नाही, त्यामध्ये माझे नाव जोडून आपल्यावर आणि पक्षावर दबाव निर्माण केला जात आहे, हे पाहून मन व्यथित होते.
ज्या नेतृत्वाचा सन्मान जपण्यासाठी मी आजवर काम केले, त्याच नेतृत्वाच्या बदनामीचे कारण माझ्यामुळे व्हावे, ही कल्पनाही मला सहन होत नाही. माझी निष्ठा आणि माझ्या कार्याची पावती आरोपांच्या माध्यमातून दिली जात असल्याची भावना मनाला बोचत आहे.
म्हणूनच, मी ठाणे जिल्हा महिला आघाडी प्रमुख पदाचा राजीनामा आपणाकडे सुपूर्द करीत आहे. हा निर्णय नाराजीतून नव्हे, तर आपल्या नेतृत्वाचा सन्मान आणि पक्षाची प्रतिष्ठा जपण्यासाठी घेतला आहे.
माझ्या भावनांची बाजू आपण समजून घ्याल, ही अपेक्षा…



