ठाणे महापालिकेचे ३ अधिकारी निलंबित; दोघांना कारणे दाखवा नोटीस…

thane – ठाणे महानगरपालिकेच्या ३ अधिकार्यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे तसेच इतर २ अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
नवरात्रोत्सवातील देवीमूर्ती विसर्जन व्यवस्थेतील ढिसाळ नियोजन आणि कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत ठाणे महापालिकेने मुख्य अग्निशमन अधिकारी गिरीष झळके, नौपाडा-कोपरी प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त महेशकुमार जामनोर आणि कार्यकारी अभियंता ऋषिकेश जवळकर यांच्यावर तडकाफडकी निलंबनाची कारवाई केली आहे.

तर आपत्ती व्यवस्थापन विभागाचे प्रमुख यासिन तडवी आणि सुरक्षा विभागाचे प्रमुख घनश्याम फर्डे यांना देखील कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. आपल्यावर निलंबनाची कारवाई का करु नये याची कारणे दाखवा हे देखील नोटीसीत बजावण्यात आले आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.
मासुंदा तलाव येथील दत्त मंदिर घाटावर विसर्जनाच्या दिवशी या सर्वांची नियुक्ती करण्यात आली होती. विसर्जन घाटावरील संपूर्ण नियोजन, सुरक्षितता आणि आवश्यक उपाययोजनांवर देखरेख ठेवण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली होती. मात्र, नियुक्ती असतानाही ते किंवा त्यांच्या अधिनस्त अधिकारी उपस्थित नसल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे. विसर्जन सुरळीत पार पडण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी वेळेत उपस्थित राहणे आवश्यक असताना त्यांनी कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.



