ठाणे

Thane:अनधिकृत गौण खनिज उत्खनन करणाऱ्यांवर दाखल होणार फौजदारी गुन्हे…

Thane – ठाणे तालुक्यांतर्गत येणारे बाळकुम मंडळ, ठाणे मंडळ, मुंब्रा मंडळ या मंडळाच्या अखत्यारीमध्ये अनधिकृत गौण खनिज वापराच्या अनुषंगाने केलेल्या दंडाच्या आदेशानुसार संबंधितास अनेक वेळा संधी देवूनदेखील, महाराष्ट्र शासनास दंडाची रक्कम वेळेत न भरल्याने आता नवी मुंबई पाठोपाठ ठाणे, मध्ये देखील एकूण 52 कसूरदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश ठाणे तहसिलदार उमेश पाटील यांनी दिले आहेत.

संबंधितांना अनेक वेळा संधी देवूनही त्यांनी शासनाची दंडनीय रक्कम न भरल्याने त्यांच्यावर आता फौजदारी गुन्हा दाखल होणार असल्याबाबतची माहिती निवासी नायब तहसिलदार दिनेश पैठणकर यांनी दिलेली आहे.

गौण खनिजाचे बेकायदेशीर उत्खनन व दंड थकवणाऱ्या ५२ बड्या कंपन्या व व्यक्तींविरुद्ध थेट फौजदारी गुन्हे (FIR) दाखल करण्याचे आदेश ठाणे तहसिलदारांनी दिले आहेत.

ठाणे व बेलापूर महसूल क्षेत्रांतर्गत गौण खनिजाचे (वाळू, माती, दगड) अनधिकृत उत्खनन, साठवणूक व वाहतूक केल्याप्रकरणी आकारण्यात आलेला कोट्यवधी रुपयांचा दंड वारंवार नोटीस देऊनही न भरणाऱ्या संबंधित व्यक्ती व बांधकाम कंपन्यांविरुद्ध तात्काळ फौजदारी गुन्हे (FIR) दाखल करण्याचे सक्त आदेश ठाणे तहसिलदार व कार्यकारी दंडाधिकारी श्री. उमेश पाटील यांनी दिले आहेत.

महसूल व वन विभागाच्या दि. २३ जून २०२५ च्या शासन परिपत्रकानुसार, शासकीय महसुलाची बुडवणूक करणाऱ्यांवर केवळ दंडात्मक कारवाई न करता फौजदारी कारवाई करण्याचे निर्देश आहेत. त्यानुसार बाळकूम, मुंब्रा आणि ठाणे मंडळातील एकूण ५२ कसूरदारांवर (व्यक्ती व संस्था) गुन्हे नोंदवण्यासाठी परिमंडळ १ (ठाणे शहर विभाग) व परिमंडळ ५ (वागळे इस्टेट – घोडबंदर विभाग) अंतर्गत येणाऱ्या १३ पोलीस ठाण्यांच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना पत्र पाठवण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page