दोन मुलींना रात्री रस्त्यावर उतरविले; एसटीच्या दोन कर्मचाऱ्यांचे निलंबन

Mumbai – एसटी बसमधून प्रवास करणाऱ्या दोन अल्पवयीन मुलींना रात्रीच्या वेळी अंधारात रस्त्यावर उतरविल्याच्या घटनेची परिवहन मंत्री तथा महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणी तातडीने चौकशी करून संबंधित चालक आणि वाहक यांना 16 नोव्हेंबर 2026 पासून निलंबित करण्यात आले आहे.
14 नोव्हेंबर 2026 रोजी भंडारा आगाराच्या एसटी बसमधून प्रवास करणाऱ्या दोन अल्पवयीन मुलींना रोहा येथे रात्रीच्या वेळी अंधारात बसमधून उतरविण्यात आल्याची बातमी स्थानिक वृत्तपत्रे, वृत्तवाहिन्या आणि समाजमाध्यमांवर प्रसिद्ध झाली होती. या घटनेमुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्न उपस्थित झाले होते. या वृत्ताची तातडीने दखल घेत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एसटी प्रशासनाला सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार भंडारा विभाग नियंत्रक आणि आगार व्यवस्थापक यांच्यामार्फत प्राथमिक चौकशी करण्यात आली. या चौकशीत संबंधित चालक अनिल सावरे आणि वाहक उदेभान मेश्राम यांची जबाबदारी निश्चित करण्यात आली असून, दोघांनाही निलंबित करण्यात आले आहे. तसेच महामंडळाच्या शिस्त व आवेदन कार्यपद्धतीनुसार त्यांच्याविरुद्ध पुढील कारवाई सुरू करण्यात आली आहे.

भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी एसटी कर्मचाऱ्यांनी विशेषतः शालेय विद्यार्थी आणि अल्पवयीन प्रवाशांच्या सुरक्षिततेची अधिक काळजी घ्यावी. विद्यार्थ्यांना त्यांच्या घरापर्यंत सुरक्षित पोहोचविण्याची जबाबदारी एसटी प्रशासनाची असून, कर्मचाऱ्यांनी त्यांच्याशी स्वतःच्या मुलांप्रमाणे संवेदनशीलतेने वागावे, अशा सूचना मंत्री सरनाईक यांनी दिल्या आहेत. यासंदर्भात एसटी प्रशासनाने आवश्यक त्या परिपत्रकीय सूचना तातडीने निर्गमित कराव्यात, असेही त्यांनी निर्देशित केले आहे.
प्रवाशांचा सुरक्षित प्रवास ही एसटी महामंडळाची सर्वोच्च प्राथमिकता आहे. विशेषतः महिला, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिक यांच्या सुरक्षिततेबाबत कोणतीही हयगय खपवून घेतली जाणार नाही. कर्तव्यात कसूर करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल. सध्या संबंधित कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले असून, यापुढे अशा प्रकारची घटना घडल्यास जबाबदार अधिकारी व कर्मचाऱ्यांना सेवेतून बडतर्फ करण्याची कारवाई करण्यात येईल, असा इशाराही परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिला आहे.



