डोंबिवली

डोंबिवलीत मॅरेथॉनमुळे रविवारी वाहतुकीत बदल…

Dombivali – डोंबिवली मॅरेथॉन २०२६ च्या अनुषंगाने डोंबिवली शहरातील वाहतुकीत तात्पुरते बदल करण्यात आले आहेत. याबाबत वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त पंकज शिरसाट यांनी डोंबिवली वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय अहिरे यांनी दिलेल्या प्रस्तावाप्रमाणे या वाहतूक बदलाची अधिसूचना प्रसिद्ध केली आहे.

त्यानुसार, डोंबिवली पूर्व व पश्चिम परिसरातील मुख्य रस्त्यांवर वाहतुकीत बदल करण्यात येणार आहेत. शहरातील १७ ठिकाणी वाहनांना प्रवेशबंदी लागू करण्यात आली आहे. ही अधिसूचना रविवार, २९ नोव्हेंबर रोजी पहाटे ४ वाजल्यापासून रविवारी सकाळी ११ वाजेपर्यंत लागू राहणार आहे.

डोंबिवली शहरात दि.२९/११/२०२६ रोजी पहाटे ०४:०० वाजेपासून जिमखाना रोड डोंबिवली पूर्व व मदन ठाकरे चौक, फडके रोड डोंबिवली पूर्व या ठिकाणी डोंबिवलीकर एक सांस्कृतिक परिवार आणि कल्याण डोंबिवली रनर्स ग्रुप याच्या संयुक्त विद्यमाने “डोंबिवलीकर फ्रेंडशिप रन २०२६” मॅरेथॉन कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

सदर मॅरेथॉनमध्ये विविध धावपटु तसेच रविंद्र चव्हाण, ( भाजप, आमदार आणि महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष ) तसेच इतर मान्यवर सहभागी राहणार आहेत. सदर परिसरात वाहतूक कोंडी होऊ नये व परिसरातील वाहतूक सुरळीत व सुनिश्चित राहण्यासाठी वाहतुकीत तात्पुरते बदल करण्यात आले आहेत.

खालीलप्रमाणे वाहतुकीत बदल आहेत…

डोंबिवली पूर्वेकडील छत्रपती शिवाजी महाराज सर्कल (घरडा सर्कल) ते टिळक चौक या मार्गावर सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद करण्यात येणार आहे. ही वाहने शिवाजी महाराज सर्कल ते टिळक चौक दरम्यानच्या रस्त्यावरून इच्छित स्थळी जातील. छत्रपती शिवाजी महाराज सर्कल येथून कल्याण रस्तामार्गे टिळक चौकाकडे येणाऱ्या केडीएमटी, एनएमएमटी, खासगी बस व अवजड वाहनांनाही प्रवेशबंदी असेल.

डोंबिवली पश्चिमेतून पूर्व भागात जाण्यासाठी ठाकुर्ली पुलाकडे जाणाऱ्या वाहनांना बावनचाळ आणि महात्मा गांधी रस्ता (भावे सभागृह) परिसरात प्रवेश बंद आहे. ही वाहने कोपर पुलावरून इच्छित स्थळी जातील. डोंबिवली पूर्वेकडून टिळक चौकमार्गे पाटणकर चौक (चार रस्ता) येथे जाणाऱ्या वाहनांनाही हे निर्बंध लागू राहतील. ही वाहने टिळक पुतळा येथून भगतसिंग रस्त्याने जातील.

गिरनार चौक, डाॅ. राजेंद्र प्रसाद रस्ता मार्गे टिळक चौकाकडे जाणाऱ्या वाहनांना गिरनार चौक येथे प्रवेश बंद असेल. ही वाहने शिवमंदिर रस्ता, नेरूरकर रस्त्याने जातील. फडके रोडवरील आप्पा दातार चौक, बाजीप्रभू चौकात वाहने उभी करण्यास मज्जाव आहे. फडके रोडकडे नेहरू रस्ता मार्गे येणारी वाहने सावकर रस्ता, इंदिरा चौकातून जातील.

९० फुटी रोडवरील ९० फुटी काॅर्नर, मोहन सृष्टीकडून येणाऱ्या वाहनांना ९० फुटी काॅर्नर येथे प्रवेश बंद असेल. ही वाहने कचोरे, खंबाळपाडा येथून जातील. ठाकुर्ली पूर्वेतून खंबाळपाडा, म्हसोबा चौकाकडे जाणाऱ्या वाहनांना जुने हनुमान मंदिर येथे प्रवेश बंद असेल. ही वाहने पंचायत बावड़ी, व्ही. पी. रस्ता, नेहरू रस्ता मार्गे इच्छित स्थळी जातील.

याशिवाय, ठाकुर्ली रेल्वे स्थानक पूर्व परिसर, पार्वती रेसिडेन्सी शाळा चौक, गोपाळनगरमधील गल्ली क्रमांक १, २ व ३, टिळकनगर परिसर, पाथर्ली रोड, टेम्पो स्टँड, जिमखाना रोड आणि डी.एस.पी. बँक चौक या ठिकाणीही वाहनांच्या प्रवेशावर निर्बंध असतील. डोंबिवली पश्चिमेकडील राजीवनगर रोड, बनवाचाळ आणि संबंधित परिसरातील काही मार्गांवरही वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत.

पर्यायी मार्ग

या बंद मार्गांना पर्याय म्हणून वाहन चालकांना संत नामदेव पथ, महात्मा गांधी रोड, कोपर ब्रिज, नेहरू रोड, तसेच इतर जोडरस्त्यांचा वापर करून इच्छित स्थळी जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे. प्रत्येक बंद मार्गासाठी वाहतूक विभागाने पर्यायी मार्ग निश्चित केले आहेत. वाहन चालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा आणि अनावश्यक वाहतूक कोंडी टाळण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन वाहतूक विभागाने केले आहे.

सदर वाहतूक नियंत्रण अधिसूचना पोलीस वाहने, फायर ब्रिगेड, रुग्णवाहिका व इतर अत्यावश्यक सेवेतील वाहनांना लागू राहणार नाही

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page