मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत; सिग्नल यंत्रणेत बिघाड…

mumbai – मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली. कांजूरमार्ग रेल्वे स्थानकाजवळ सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने लोकल आणि एक्स्प्रेस गाड्या उशिराने धावत आहेत. या बिघाडांमुळे लोकल गाड्या ३० ते ४५ मिनिटे उशिराने धावत असून, प्रवाशांना स्थानकांवर आणि रुळांवर ताटकळत राहावे लागत आहे. त्यामुळे कामावरून घरी परतणाऱ्या चाकरमान्यांसह हजारो प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत.

अचानक सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्यामुळे पाठोपाठ येणाऱ्या लोकल गाड्या रुळांवरच थांबवाव्या लागल्या. या बिघाडाचा परिणाम लोकलच्या वेळापत्रकावर झाला. मुंबईच्या दिशेने प्रवास करणाऱ्या गाड्या पाऊण तास रखडल्या. त्यामुळे ठाणे, कल्याण, डोंबिवली, मुंब्रा, कुर्ला, दिवा, दादर आदी रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची गर्दी दिसून येत होती.
दरम्यान, याचा परिणाम आता कामावरून घरी परतणाऱ्या चाकरमान्यांसह हजारो प्रवाशांना भोगावा लागत आहे. अनेक रेल्वे स्थानकावर प्रचंड गर्दी झाल्याने मोठे हाल होत आहे.



