१४ हजार लिटर डिझेल, २५ हजार लिटर पेट्रोलियमसदृश द्रवपदार्थ जप्त; ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल…

mumbai – मुंबई-ठाणे शिधावाटप विभागाच्या भरारी पथकाने नवी मुंबईतील तुर्भे परिसरात अवैधरित्या इंधन काढण्याच्या प्रकारावर कारवाई करत दोन टँकरसह सुमारे १४ हजार लिटर डिझेल आणि २५ हजार लिटर पेट्रोलियमसदृश द्रवपदार्थ जप्त केला आहे. या कारवाईत जप्त केलेल्या मुद्देमालाची एकूण अंदाजित किंमत ९४ लाख ३६ हजार ७०८ रुपये आहे. याप्रकरणी पाच जणांविरुद्ध तुर्भे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

डिझेलची वाहतूक करणाऱ्या टँकरच्या आउटलेटमधून अवैधरित्या डिझेल काढून या दुसऱ्या टँकरच्या इंधन टाकीत भरले जात असल्याची बाब निदर्शनास आल्यानंतर पथकाने छापा टाकला. या कारवाईदरम्यान दोन्ही टँकर आणि त्यामधील इंधनसदृश पदार्थ जप्त करण्यात आले.
याप्रकरणी दोन्ही टँकरचे चालक-मालक अशा एकूण पाच जणांविरुद्ध तुर्भे पोलीस ठाणे, नवी मुंबई येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास तुर्भे पोलीस करीत आहेत.



