कल्याणमध्ये भटक्या कुत्र्यांचा हैदोस; १०० हुन अधिक नागरिकांचा घेतला चावा…

kalyan – कल्याणमधील खडकपाडा परिसरामध्ये एका भटक्या कुत्र्याने १०० पेक्षा अधिक नागिरकांना चावा घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली. रस्त्यावरून येणाऱ्या-जाणाऱ्या, गादीवर बसलेल्या लोकांना हा कुत्रा चावला.
मिळालेल्या माहितीनुसार, संदीप हॉटेल आणि खडकपाडा परिसरात हि घटना घडली. जखमींना महापालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याचदरम्यान एका ११ वर्षीय मुलीवर कुत्र्याने केलेल्या हल्ल्यात ती गंभीर जखमी झाली असून, पुढील उपचारांसाठी तिला सायन रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
अनेक प्रयत्नांतर संबंधित कुत्र्याला पकडण्यात प्रशासनाला यश आले आहे. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
दरम्यान, कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात दिवसेंदिवस भटक्या कुत्र्यांची संख्या वाढत चालली आहे. गल्ली, रस्त्यावर भटक्या कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणार आहे. एकाच एरियात जवळ जवळ ७ ते ८ कुत्रे आणि त्यांची पिल्ले वावरत असतात. रस्त्याच्या एका कडेला ठाण मांडून बसलेले असतात. आणि येणाऱ्या जाणाऱ्या गाड्या, लोकांवर धावून येतात. रात्री १० नंतर तर अक्षरशः रस्त्याच्या मधोमध येऊन बसतात. आणि दुचाकीवरून येणाऱ्या -जाणाऱ्या चालणाऱ्या नागरिकांच्या अंगावर धावून येतात. नागरिकांना आपला जीव मुठीत घेऊन गाडी चालवावी लागते. अशी परिस्थिती कल्याण डोंबिवली परिसरात झाली आहे.
डोंबिवली पूर्वेतील दत्त नगर, गांधी नगर, मॉर्डन स्कुल, पांडुरंग वाडी, उद्यान परिसर या भागात तर झुंडीच्या झुंडीने भटकी कुत्री बिनधास्त वावरत असतात.
उद्यान परिसरात सकाळच्या वेळी वृद्ध नागरिक येत असतात. शिवाय सकाळी कामावर, शाळेत जाणाऱ्या मुलांचा वर्ग देखील मोठा आहे या कुत्र्यांमुळे त्यांच्याही जीवाला धोका निर्माण झाला आहे.
दरम्यान, एकीकडे कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेकडून निर्बीजकारणासाठी कोट्यवधी रुपये खर्च केले जात आहे. तर दुसरीकडे भटक्या कुत्र्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या प्रकारामुळे पालिकेच्या उपाययोजनांवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.



