महाराष्ट्र

शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्यासाठी सांगलीमध्ये विराट मोर्चा…

sangli – गरज नसलेला शक्तिपीठ महामार्ग रद्द करावा या मागणीसाठी शक्तिपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीच्या वतीने सांगलीत मोठा मोर्चा काढण्यात आला. सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर हा विराट मोर्चा काढण्यात आला. या मोर्च्यामध्ये शेतकरी आणि सर्वपक्षीय नेते सहभागी झाले होते.

सांगलीच्या क्रांतीसिंह नाना चौकातून या मोर्चाला सुरुवात झाली. क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्याला अभिवादन करून सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर काढलेल्या या मोर्चामध्ये १३ जिल्ह्यातील शेतकऱ्यांसह महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या.

तसेच राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील, काँग्रेसचे नेते सतेज पाटील, खासदार विशाल पाटील, माजी खासदार राजू शेट्टी, महादेव जानकर यांच्यासह धनाजी गुरव, बी.जी. पाटील, कॉ. गिरीष फोंडे, जिल्हा परिषद अध्यक्ष संगीता पाटील, देवराज पाटील, महेश खराडे, किरण लाड, अभिजीत पाटील, विराज नाईक, रणधीर नाईक, सांगली जि. प. विरोधी पक्षनेता मंगेश चव्हाण यांच्यासह शक्तीपीठ विरोधी संघर्ष समितीचे सर्व पदाधिकारी आणि बाधित शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विश्रामबाग चौकातून सुरू झालेला हा मोर्चा सांगली जिल्हाधिकारी कार्यालय ठिकाणी आल्यानंतर मोर्चाचे रूपांतर सभेमध्ये झाले.

प्राण देऊ पण, शक्तिपीठ महामार्गासाठी जमीन देणार नाही’, ‘जमीन आमच्या हक्काची, नाही कोणाच्या बापाची’, ‘शक्तिपीठ महामार्ग रद्द झालाच पाहिजे, असे फलक झळकावत शेतकऱ्यांनी जोरदार घोषणा दिल्या.

तर आंदोलन मोडून काढायला सरकारने अलीकडे खास अधिकारी या जिल्ह्यात पाठवले आहे, आपणही तेवढ्या ताकदीने आहोत. जेल फोडणाऱ्या वसंतदादांचा हा जिल्हा आहे. त्यामुळं सांगली जिल्हा महाराष्ट्रात सगळ्यात वेगळा जिल्हा आहे. क्रांतिसिंह नाना पाटलांचं नाव घेऊन आम्ही या लढाईला सुरुवात केली आहे. सरकारने शक्तिपीठबाबत पुनर्विचार केला पाहिजे, असा हल्लाबोल नेते जयंत पाटील यांनी केला.

शक्तीपीठचा घाट या सरकारने घातला. पण निवडणुकीच्या वेळी शिंदे साहेबांनी शक्तीपीठ रद्द करण्याचं आश्वासन दिलं होतं. पण ते निवडणुकीसाठी होतं. रत्नागिरी मार्ग आहे. त्या रस्त्यावरून जायला माणसं नाहीत. पण या शक्तीपीठचा घाट यांनी घातला आहे. बारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्यावतीने आम्ही हा निर्णय घेतला आहे. शक्तीपीठ रद्द झालाच पाहिजे असं काँग्रेस नेते सतेज पाटील म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page