नागपूरमध्ये १ नोव्हेंबर पर्यंत DJ वर बंदी…

nagpur – नागपूरमध्ये डीजे आणि डॉल्बी साऊंड सिस्टीमवर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. हि बंदी १ नोव्हेंबर पर्यंत असणार आहे. तसेच नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. येणाऱ्या सण-उत्सवाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.
नागपूरचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी याबाबतची अधिकृत अधिसूचना जारी केली आहे. ही बंदी ३ सप्टेंबरच्या मध्यरात्री १२:०० वाजल्यापासून १ नोव्हेंबर रोजी रात्री ११:५९ वाजेपर्यंत संपूर्ण नागपूर पोलीस आयुक्तालय हद्दीत लागू राहील. या काळात टॉप, मिड, बेस अशा मल्टिलेयर स्पीकर डॉल्बी सिस्टिमवर पूर्ण बंदी.

प्लाझ्मा साऊंड आणि प्रेशरमिड साऊंड सिस्टिमच्या वापरावर मनाई. डोळ्यांना आणि आरोग्याला अपायकारक ठरणाऱ्या तीव्र लेझर लाईट्स व डिम लाईट्सवर बंदी. साऊंड सिस्टिम (DJ) बसवण्यासाठी बेकायदेशीररीत्या बदल (मॉडिफाय) केलेल्या वाहनांवर बंदी; अशी वाहने व सिस्टिम सिलबंद ठेवण्याचे आदेश.
तर ध्वनी प्रदूषणाच्या विहित मर्यादेचे काटेकोर पालन करणाऱ्या सर्वसामान्य साऊंड सिस्टिमला या नियमातून सूट देण्यात आली आहे.
ध्वनी प्रदूषणाला आळा घालण्यासाठी आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी डीजे (DJ) ऐवजी ढोल-ताशे, बँड, संदल व भजनासारख्या पारंपरिक वाद्यांचा वापर करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.



