जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडीत चिमुकलीवर अत्याचार करून हत्या…

pune – पिंपळवंडी (ता. जुन्नर ) येथे साडे नऊ वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. नराधमाने चिमुकलीला गावाबाहेरील एका शेतात नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केले आणि त्यानंतर तिची निर्घृण हत्या केली.
माहितीनुसार, साहिल खैरे असं या नराधमाचं नाव असून तो बहिणीच्या घरी कामानिमित्त आला होता. त्यानंतर तो बहिणीच्या घरीच राहत होता. बहिणीच्या घराच्या जवळच राहणाऱ्या चिमुकलीसोबत त्याची ओळख झाली त्यानंतर त्याने त्या चिमुकलीला सायकलवरून जवळच असलेल्या उसाच्या शेतात नेले आणि तेथे तिच्यावर पाशवी अत्याचार करून तिची हत्या केली.

मुलगी बेपत्ता झाल्यानंतर कुटुंबीयांनी पोलिसांत तक्रार दिली. शोध मोहीम सुरू असताना संशयित आरोपी स्वतः गावकऱ्यांसोबत आणि पोलिसांसोबत शोध घेण्याचे नाटक करत होता. त्याच्या हालचालींवर संशय आल्याने पोलिसांनी त्याला कसून चौकशीसाठी ताब्यात घेतले, जिथे त्याने गुन्ह्याची कबुली दिली आणि मृतदेह कुठे फेकला हे दाखवले.
या घटनेमुळे पिंपळवंडी व जुन्नर तालुक्यात प्रचंड संतापाची लाट उसळली असून ग्रामस्थांनी आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे.
दरम्यान, यासंदर्भात आपण पुणे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधून तपासाचा आढावा घेतला. या प्रकरणाची अत्यंत पारदर्शक व सखोल चौकशी करून नराधम आरोपीवर कठोर कारवाई करण्याचे स्पष्ट निर्देश पोलीस प्रशासनाला देण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी दिली.



