ठाण्यात लाच घेताना वरिष्ठ लिपिकासह एकास एसीबीने रंगेहात पकडले…

ठाणे – ठाण्यातील सह जिल्हा निबंधक वर्ग १ तथा मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालयातील वरिष्ठ लिपिक आणि एका खासगी व्यक्तीस लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. दीपक इसळ (लिपिक) आणि अजित कोकमकर (खासगी व्यक्ती) अशी या दोघांची नावे आहेत.
तक्रारदाराकडून ३५ हजार रुपये लाच घेताना एसीबीने या दोघांना रंगेहात पकडले असून, दोघांवरही ठाणे नगर पोलीस गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदाराच्या आईच्या १९८७ मधील मालमत्तेचे (भाईंदर, पश्चिम येथील गाळा) खरेदी खत अभय योजनेअंतर्गत अधिकृत करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे मिळवून देण्यासाठी लिपिक इसळ याने ७० हजार रुपयांची मागणी केली होती. ती तडजोडीनंतर ६५ हजार रुपयांवर निश्चित झाली.
यापैकी पहिला हप्ता म्हणून ३५ हजार रुपयांची लाच खासगी व्यक्ती कोकमकर तक्रारदाराकडून घेत असताना एसीबीच्या पथकाने त्याला रंगेहाथ पकडले. तसेच लिपिक इसळ यालाही अटक करण्यात आली.
दरम्यान, ठाणे नगर पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.


