कल्याण-डोंबिवली महापालिकेतील महत्त्वाची फाईल गायब…

kalyan – कल्याण पश्चिमेतील रेतीबंदर परिसरात मौलवी कम्पाउंडजवळ उभारलेली १० मजली बेकायदा इमारत युसूफ हाइट्स संदर्भातील महत्त्वाची फाईल कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या अभिलेख विभागातून गायब झाल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी महापालिकेच्या नगररचना विभागातील कनिष्ठ अभियंता ज्ञानेश्वर अडके यांनी बाजारपेठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून, बाजारपेठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. युसूफ हाइट्स या इमारतीच्या फाईलची माहिती निसार शेख यांनी माहिती अधिकारात महापालिकेकडे मागितली होती. ती देण्यासाठी महापालिकेने शोधाशोध सुरू केली त्यावेळी हा प्रकार उघड झाला.
महापालिकेच्या विकास आराखड्यानुसार, मौलवी कम्पाउंडनजीक बेघरांसाठी ३७६ चौरस मीटरचा भूखंड आरक्षित आहे. त्याच्याबरोबर ११५ चौरस मीटरचा भूखंड खेळाच्या मैदानाकरिता आरक्षित आहे. दोन्ही आरक्षित भूखंडांवर युसूफ हाइट्स इमारत उभी केली आहे. जमीनमालक असमत मौलवी आणि कुलमुखत्यारधारक सलमान डोलारे यांनी मिळून इमारत विकसित केली.
बिल्डरने त्याच्या साथीदाराच्या मदतीने बनावट कागदपत्रे तयार केली. महापालिकेला बनावट आराखडा सादर केला तसेच ओसीसुद्धा तयार केली. महापालिकेची परवानगी मिळविली असल्याचे भासविले. युसूफ इमारतीत १० जणांनी गुंतवणूक केली. त्यांच्याकडून १ कोटी ८२ लाख रुपये उकळले. त्यांची फसवणूक केली. या प्रकरणी दोन वर्षांपूर्वी बाजारपेठ पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. बिल्डर सलमान डोलारे फरार आहे. याच प्रकरणातील बेकायदा इमारतीची फाईल गहाळ झाल्याने बिल्डरला वाचविण्याकरिता फाईल गायब केल्याचा संशय आहे.
दरम्यान, महत्त्वाच्या फाईल महापालिकेतून गायब होतातच कशा? या प्रकरणामुळे मोठी खळबळ माजली असून प्रशासनाच्या कारभारावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. या प्रकरणात कोणाचा हात आहे याचा शोध पोलिसांनी घेतला पाहिजे अशी मागणी होत आहे. महापालिकेत नेमकं चाललंय तरी काय सर्व मनमानी कारभार चालू आहे.
एकतर कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत अनधिकृत बांधकामांचे मोठे जाळे पसरले आहे, या बांधकामांना परवानगी कोण देते? हा एका अनुत्तरित प्रश्नच आहे शिवाय प्रशासन या बांधकामांवर कारवाई करत पण नाहीत आणि यात आता फाईल गायब मग याला जबाबदार कोण? आयुक्तांचे केडीएमसीत लक्ष आहे कि नाही? जर महत्त्वाच्या फाईल गायब होत राहिल्या तर सर्व सामन्यांना न्याय कसा मिळणार?
या प्रकरणामुळे आता अनधिकृत बांधकामानांना केडीएमसीच पाठिशी घालते कि काय असा आता प्रश्न जनतेत निर्माण झाला आहे. शिवाय फाईल प्रकरणी योग्य तो तपास करून दोषींवर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी जनतेतून होत आहे.



