किरकोळ कारणावरून मराठी तरुणाला बेदम मारहाण…

dombivali – किरकोळ कारणावरून एका मराठी तरुणाला तिघांनी बेदम मारहाण केली असल्याची घटना डोंबिवली पश्चिमेत घडली आहे. याप्रकरणी विष्णु नगर पोलिसांनी ओंकारनाथ तिवारी, सत्यम तिवारी आणि जय शुक्ला गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरु केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, डोंबिवली पश्चिमेतील सरोवरनगर परिसरात हि घटना घडली असून, घरासमोर सांडपाणी साचत असल्याच्या कारणावरून वाद होऊन विशाल पाटील यांना त्यांच्या शेजारी राहणाऱ्या ओंकारनाथ तिवारी, सत्यम तिवारी आणि जय शुक्ला या तिघांनी मारहाण केली.
विशाल पाटील यांनी त्यांच्या घरासमोर सांडपाणी साचत असल्याबाबत समोरील सोसायटीत राहणाऱ्या ओंकारनाथ तिवारी यांना जाब विचारला असता, दोघांमध्ये बाचाबाची झाली आणि त्यानंतर वादाचे रूपांतर धक्काबुक्की आणि मारहाणीत झाले. याप्रकरणी विशाल पाटील यांना मारहाण करण्यात आल्याची तक्रार दिल्यानंतर विष्णूनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



