शिंदे गटाचे नगरसेवक रमेश म्हात्रेंना मुंबई उच्च न्यायालयाचा दणका…

mumbai – शिवसेना शिंदे गटाचे नगरसेवक रमेश म्हात्रे यांना मुंबई उच्च न्यायालयाने मोठा दणका दिला आहे. कल्याणच्या प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी दिलेला जामीन उच्च न्यायालयाने रद्द केला आहे. तसेच रमेश म्हात्रे यांना उद्या संध्याकाळी पाच वाजेपर्यंतची वेळ देण्यात आली आहे. रविवारी संध्याकाळी पाच वाजेपर्यंत रमेश म्हात्रे यांनी पोलिसांना शरण जावं अन्यथा त्यांच्या मालमत्तांवर टाच आणली जावी, असा आदेश न्यायालयाने दिला आहे.
कल्याण कोर्टाने दिलेल्या जामीन आदेशाविषयी न्यायालयाने सुमोटो दाखल करून या प्रकरणावर विशेष सुनावणी घेतली. प्रभारी मुख्य न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि न्यायमूर्ती गौतम अंखड यांच्या खंडपीठाने हा अंतरिम आदेश दिला.
नगरसेवक रमेश म्हात्रे यांनी एक महिला डॉक्टरसह नर्स आणि कर्मचाऱ्यांना मारहाण केली होती. या प्रकरणात म्हात्रेंसह चार जणांना डोंबिवलीतील विष्णुनगर पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर या चौघांना कल्याण न्यायालायने जामीन मंजूर केला होता. दरम्यान, रमेश म्हात्रेंना दिलेला जामीन मुंबई उच्च न्यायालयाकडून रद्द करण्यात आला आहे. उद्या संध्याकाळी 5 वाजेपर्यंत पोलिसांसमोर शरण येण्याचे आदेश देण्यात आले आहेत.



