मुंब्रा पोलिसांची उत्कृष्ट कामगिरी; ३ महिन्यांच्या चिमुकलीची केली सुटका…

thane – मुंब्रा परिसरात अपहरण झालेल्या तीन महिन्यांच्या मुलीची मुंब्रा पोलिसांनी सुखरूप सुटका करत दोघांना अटक केली आहे. मोहम्मद गुलाब आणि खैरणूनिसा मोहम्मद अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. हे दोघे पती पत्नी आहेत. अकोला जिल्ह्यातील खेटरी गावातून पोलिसांनी या दोघांना अटक केली.
याबाबत वृत्त असे आहे कि, खडीमशीन रोडवरून बुरखाधारी महिलेने मदतीचा बहाणा करून बाळाचे अपहरण केले होते. फरझाना मन्सुरी या मुंब्रा येथील खडी मशीन रोडवर आपल्या दोन मुलींसह बाजारात गेल्या होत्या. त्यांची एक मुलगी तीन वर्षांची तर दुसरी मुलगी तीन महिन्यांची आहे. बाजरातून घरी येत असताना रस्ता ओलांडताना एका अनोळखी महिलेनं फरझानाकडे येत मी बाळाला धरते, तुम्ही रस्ता पार करा,असे सांगितले. फरझानाने त्यांची 3 महिन्यांची मुलगी त्या महिलेकडे दिली. त्यानंतर मोठ्या मुलीला घेऊन त्यांनी रस्ता ओलांडला. पण फरझाना रस्ता ओलांडते तोच त्या महिलेने त्या लहान बाळासह रिक्षातून पळ काढला होता.
या प्रकरणी मुंब्रा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. त्याअनुषंगाने पोलिसांनी तपास करून मिळालेल्या माहितीच्या आधारे अकोला जिल्ह्यातील खेटरी गावातून मोहम्मद गुलाब आणि खैरणूनिसा मोहम्मद या दोघांना अटक केली.
सदरची यशस्वी कामगिरी ठाणे पोलीस आयुक्त अशुतोष डुंबरे, सह आयुक्त ज्ञानेश्वर चव्हाण, अपर आयुक्त विनायक देशमुख, उपायुक्त सुभाषचंद्र बुरसे व सहाय्यक आयुक्त प्रिया डमाळे यांच्या मार्गदर्शनाखाली मुंब्रा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिंदे, पोलीस निरीक्षक नितीन पगार, शरद कुंभार आणि पोलीस पथकाने केली आहे.



