जिष्णू देव वर्मा यांनी घेतली राज्यपाल पदाची शपथ…

mumbai – महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी राज्यपाल पदाची शपथ घेतली. लोकभवनातील दरबार सभागृह येथे झालेल्या शपथविधी सोहळ्यात मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती चंद्रशेखर यांनी त्यांना राज्यपालपदाची शपथ दिली.
शपथविधीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. जिष्णू देव वर्मा हे महाराष्ट्राचे २२ वे राज्यपाल आहेत.

सुरुवातीला मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी जिष्णू देव वर्मा यांच्या नियुक्तीसंदर्भातील राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी काढलेली अधिसूचना वाचून दाखवली. कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीत व राज्यगीताने झाली तर सांगता राष्ट्रगीताने झाली. शपथविधी नंतर राज्यपालांना भारतीय नौदलातर्फे मानवंदना देण्यात आली.
शपथविधी सोहळ्याला विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे, विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, अन्न व औषध प्रशासन नरहरी झिरवळ, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी, पोलीस महासंचालक सदानंद दाते, पोलीस आयुक्त देवेन भारती, मुख्य राज्य शिष्टाचार अधिकारी राजेश गवांदे व इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.



