मुंबई

नवऱ्याने बायकोला धावत्या लोकल समोर ढकलले…

mumbai – नवऱ्याने बायकोला धावत्या लोकल समोर ढकलले असल्याचा धक्कादायक प्रकार मुलुंड रेल्वे स्टेशनवर घडला आहे. या दोघांमध्ये सतत वाद होते आणि यातूनच हा प्रकार घडला. राजुकुमार गुप्ता असे याचे नाव असून, त्याने आपल्या बायकोला धावत्या लोकल समोर ढकलले आणि तेथून पळून गेला. यात तिचा मृत्यू झाला असून, सदर प्रकरणी पोलिसांनी राजुकुमार गुप्ताला सुरतमधून अटक केली आहे. तर पुष्पा असे बायकोचे नाव आहे.

दरम्यान, घटनेच्या काही तास आधीच मृत महिलेने राजुकुमार गुप्ता विरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली होती.

मृत महिलेचा भाऊ कमलेश कुमार गुप्ता याने दिलेल्या माहितीनुसार, नवरा बायकोमध्ये सतत वाद होते त्यामुळे तो आपल्या बहिणीला आणि तिच्या 15 वर्षीय मुलाला उत्तर प्रदेशातील मूळ गावी घेऊन जाण्यासाठी आला होता. या दोघांमध्ये पुन्हा वाद झाल्यानंतर पुष्पा पोलिसांकडे गेली. त्यानंतर कमलेश, पुष्पा आणि तिचा मुलगा मुलुंड स्थानकावर पोहोचले. मात्र, कमलेशला आपले आर्मी आयडी कार्ड घरी राहिल्याचे लक्षात आले. तो आणि त्याचा पुतण्या ते आणण्यासाठी परत गेले असता, संतप्त राजुकुमारने त्यांना घरात कोंडून ठेवले. यानंतर आरोपी मुलुंड स्थानकावर पोहोचला. प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर उभी असलेल्या आपल्या बायकोला त्याने धावत्या लोकलसमोर ढकलले आणि तेथून पळ काढला.

घटनेनंतर प्रवाशांनी स्टेशन मास्टरला माहिती दिली. रेल्वे अधिकाऱ्यांनी तातडीने पुष्पाला शासकीय रुग्णालयात नेले, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. दरम्यान, कमलेशने शेजाऱ्यांच्या मदतीने स्वतःची सुटका करून घेतली. तसेच पोलिसांनी देखील तपास करून राजुकुमार गुप्ताला सुरतमधून अटक केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page