ठाणे : अनधिकृत बांधकाम प्रकरणी ५० गुन्हे दाखल, २६४ अनधिकृत बांधकामांवर कारवाई…

thane – उच्च न्यायालयाने दिलेले निर्देश आणि प्रभाग समितीच्या बीट निरिक्षकांनी केलेल्या पाहणीत तसेच दिवा आणि मुंब्रा येथील विशेष दक्षता पथकांच्या पाहणीत आढळलेल्या एकूण २६४ अनधिकृत बांधकामांवर महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने आतापर्यंत कारवाई केली आहे. त्यापैकी १९८ बांधकामे पूर्णपणे निष्कासित करण्यात आली आहेत. तर, ६६ बांधकामांमधील अनधिकृत वाढीव बांधकाम हटवण्यात आले आहे.
ठाणे महापालिका क्षेत्रात, जून महिन्यापासून नियमितपणे अतिक्रमण विरोधी पथकाची कारवाई सुरू आहे. महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी या कारवाईचा शनिवारी (२७ सप्टेंबर) आढावा घेतला.
कोणतेही अनधिकृत बांधकाम सुरू राहू नये यासाठी सर्व यंत्रणेने दक्ष राहावे. तसेच, कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून आवश्यक त्या प्रकरणात तातडीने एमआरटीपीअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात यावेत, असे निर्देश महापालिका आयुक्त राव यांनी दिले आहेत. गुन्हे दाखल करताना प्रत्यक्ष पाहणी आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा वापर करून अचूक माहिती नोंदवावी, असेही आयुक्त राव यांनी सांगितले. ज्या अनधिकृत बांधकामांचे पाडकाम शिल्लक असेल त्याचे प्रवेश मार्ग (जिने) पाडून पत्रे लावून बंद करावेत, असेही त्यांनी म्हटले.

तसेच, अनधिकृत बांधकामात घर घेऊ नये असे आवाहन करणारे फलक मोक्याच्या जागी लावावेत. नागरिकांनाही घर खरेदी करताना बांधकाम अधिकृत असल्याची खात्री महापालिकेच्या शहर विकास विभागाकडून करून घ्यावी, असे आवाहनही आयुक्त राव यांनी केले आहे.
अधिकृतपणे ज्या इमारतींचे बांधकाम सुरू आहे, त्या सर्व ठिकाणी दर्शनी भागात क्यू आर कोड लावण्यात आले आहे. ते क्यू आर कोड मोबाईलवर स्कॅन करून बांधकाम परवानगीची माहिती कोणालाही उपलब्ध होऊ शकते, असेही आयुक्त राव यांनी स्पष्ट केले.
महापालिका क्षेत्रात अनधिकृत चाळी, अनधिकृत बैठी बांधकामे, वाढीव शेड, वाढीव बांधकाम, प्लिंथचे बांधकाम, अनधिकृत टर्फ या प्रकारच्या बांधकामांवर कारवाई करण्यात आली आहे.
गुन्हे दाखल करण्यात आलेल्या प्रकरणाचा तक्ता…. (जून ते सप्टेंबर २०२५पर्यंतची आकडेवारी)
नौपाडा-कोपरी – ०१
दिवा – ११
मुंब्रा – १३
कळवा – ०४
उथळसर – ०१
माजिवडा-मानपाडा – ०५
वर्तक नगर – ०८
लोकमान्य नगर – सावरकर नगर- ०७
एकूण – ५०