डोंबिवलीत नाल्यात पडून मुलाचा मृत्यू…

dombivali – नाल्यात पडून एका शाळकरी मुलाचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे. आयुष कदम (वय १३) असे या मुलाचे नाव असून, डोंबिवली पश्चिमेत हि घटना घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, देवीचापाडा परिसरातील जगदांबा माता परिसरातून भरत भोईर नाला वाहतो. या नाल्यावर चेंबरचे झाकण नव्हते. रविवारी रात्रीच्या सुमारास आयुष कदम मित्रांसोबत याठिकाणी खेळत होता. त्यावेळी नाल्यावरील चेंबरच्या उघड्या झाकण्याच्या छिद्रातून आयुष नाल्यात पडला आणि वाहून गेला.

माहिती मिळताच तेथील स्थानिक रहिवासी, विष्णुनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामचंद्र चोपडे, पोलीस कर्मचारी आणि अग्निशमन दल दाखल झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ आयुषला नाल्यातून बाहेर काढून पालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात नेले. परंतु डाॅक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
दरम्यान, कल्याण डोंबिवलीत गेल्या काही दिवसांपासून सतत पाऊस सुरु आहे. यामुळे अनेक नाले, खाड्या दुथडी भरून वाहत आहेत. आणि अशा पावसात नाल्यावरील उघड्या झाकण्यामुळे लोक वाहून जाण्याच्या घटना अनेकदा घडत असतात. त्यामुळे याची गांभीर्याने दखल घेऊन कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या ‘ह’ प्रभाग क्षेत्र कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी उघड्या नाल्यावरील झाकण ताबडतोब बंद करणे अपेक्षित होते. हि त्यांची प्रमुख जबाबदारी आहे. पण या घटनेमुळे असे दिसून येते कि कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या ‘ह’ प्रभाग क्षेत्राने याकडे संपूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे हि घटना घडली आहे. आता या मुलाच्या मृत्यूची जबाबदारी कोण घेणार? केडीएमसी आयुक्तांनी याची दखल घेरून या मृत्यूला जबाबदार असणाऱ्या पालिका अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे.