विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलवा; वडेट्टीवारांची मागणी…

mumbai – राज्यात झालेल्या अतिवृष्टी आणि पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर तातडीने विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवर यांनी केली आहे.
याबाबत विजय वडेट्टीवार यांनी राज्याचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांना पत्र लिहिले असून, मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्र यांसह राज्याच्या अनेक भागांमध्ये अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या गंभीर आपत्कालीन परिस्थितीकडे राज्यपालांचे लक्ष वेधले. राज्यातील नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी आणि सामान्य नागरिक संकटात सापडले असून त्यांचे कधीही भरून न येणारे नुकसान झाल्याची बाब निदर्शनास आणून दिली.

विजय वडेट्टीवार आपल्या पत्रात म्हणाले की, अभूतपूर्व नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी आणि सामान्य नागरिक संकटात सापडला आहे. त्यांचे कधीही भरून न येणारे नुकसान झाले आहे. तब्बल ४ लाख हेक्टरहून अधिक पिके नष्ट झाली आहेत. जनावरे वाहून गेली, घरे कोसळली, काही ठिकाणी जीवितहानी झाली आहे. रस्ते खचले, दळणवळणाची सेवा खंडित झाली आहे. पिण्याचे पाणी दूषित झाल्याने आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यामुळे या गंभीर संकटातून राज्याला बाहेर काढण्यासाठी तातडीने ठोस धोरणात्मक निर्णय घेणे आवश्यक आहे. तातडीच्या प्रश्नावर सविस्तर चर्चा करण्यासाठी ठोस निर्णय घेण्यासाठी विधिमंडळाचे विशेष अधिवेशन त्वरीत बोलवावे.