बिस्किटात गुंगीचे औषध देऊन प्रवाशांना लुटणारा गजाआड…
kalyan – बिस्किटात गुंगीचे औषध देऊन रेल्वे प्रवाशांना लुटणाऱ्या एका सराईत चोरट्याला कल्याण लोहमार्ग पोलिसांनी अटक केली आहे. रामसुरत रामराज पाल असे याचे नाव आहे.
हा आरोपी रेल्वे प्रवाशांसोबत सलगी करून त्यांना बोलण्यात गुंतवायचा त्यानंतर त्यांना बिस्किटमधून गुंगीचे औषध खाण्यास द्यायचा. प्रवासी गुंगी येऊन पडला की त्याच्या जवळील किंमती ऐवज किंवा त्याच्या पिशवीतील रोख रक्कम, मोबाईल घेऊन पळून जायचा.
मिळालेल्या माहितीनुसार, एक प्रवासी कल्याण रेल्वे स्थानकातील स्कायवॉकवर उभा होता. त्याला उत्तर प्रदेशात जायचे होते. त्याच्या जवळ एक ते दोन पिशव्या होत्या. तो प्रवासी उत्तर प्रदेशात जाणाऱ्या एक्सप्रेसची वाट पाहत उभा होता. आरोपी रामसुरत याने त्या प्रवाशाजवळ जाऊन तू कोठे चालला आहेस, अशी विचारणा केली. त्याने आपण उत्तर प्रदेशात चाललो आहोत, असे सांगितले. रामसुरतने मीही उत्तर प्रदेशातील असून तेथेच जाणार आहे असे सांगितले.
त्यानंतर रामसुरत याने स्वत:जवळील बिस्किट काढून खाण्यास सुरुवात केली. आणि त्यानंतर रामसुरतने प्रवाशाला द्यायच्या बिस्किटला गुंगीचे औषध लावून ते प्रवाशाला खाण्यास दिले. बिस्कीट खाल्यानंतर प्रवाशाला गुंगी आली आणि तो चक्कर येऊन पडला. याचा फायदा घेते रामसुरतने प्रवाशाची पिशवी उचलून तेथून पळ काढण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान, गस्तीवरील रेल्वे पोलिसांना हा प्रकार निदर्शनास आला. त्यांनी तातडीने रामसुरतला रोखून पिशवी कोणाची आहे? अशी विचारणा केली. रामसुरतची बोबडी वळली. पोलिसांना हा प्रकार संशयास्पद वाटल्याने त्यांनी रामसुरतला लोहमार्ग पोलीस ठाण्यात आणेल आणि तेथे त्याची कसून चौकशी करताच त्याने आपण एका प्रवाशाला बिस्किटातून गुंगीचे औषध देऊन त्याची पिशवी चोरल्याची कबुली दिली.