अवैध हातभट्टी केंद्रावर धाड, २२ गुन्हे दाखल…
मुंबई – हातभट्टी व्यावसायिकांनी पावसाचा फायदा घेत ठाणे जिल्ह्यातील देसाई गाव, शांतीनगर, सरलाबे, गोरपे गाव, कुंभार्ली गांव, भिवंडी तसेच ईतर ठिकाणी मोठ्या प्रमाणात हातभट्टी सुरू केल्या होत्या. मुसळधार पावसात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या विशेष पथकाच्या जवानांनी खाडीमधील हातभट्टी केंद्रांवर धाड़ी टाकून कार्यवाही केली.
या कारवाईमध्ये एकूण २२ गुन्हे नोंद करण्यात आले असून बेवारस १३ गुन्हे नोंदविले आहेत. या कारवाईमध्ये एकूण १४२ लिटर हातभट्टी दारू व ५३००० लिटर रसायन व इतर साहित्य असा एकूण २० लाख ४५ हजार ४७० रुपयांचा मुद्देमाल नष्ट केला आहे.
राज्य उत्पादन शुल्क आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली हातभट्टी दारूचे समूळ उच्चाटन करण्यासाठी धाडसत्र मोहीम राबविण्यात येत आहे. या धाडसत्र मोहिमेच्या अनुषंगाने विभागीय उप-आयुक्त प्रदीप पवार यांनी कोकण विभाग, भरारी पथक ठाणे, डोंबिवली, अंबरनाथ, भिवंडी निरीक्षक यांच्या समन्वयाने ही कारवाई केली. या कारवाईमध्ये हातभट्टी दारू निर्मिती ठिकाणांवर धाड टाकून अंदाज़े २०० ड्रम्स रसायन उद्ध्वस्त करण्यात आले. या मोहिमेमध्ये बोटींमधून जाऊन खाडीतील हातभट्टी निर्मिती ठिकाणे नष्ट केली.
हातभट्टी दारू निर्मिती ठिकाणे चालवणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कलम ३२८ अन्वये गुन्हे दाखल करण्यात येत आहे. तसेच एमपीडीए कायद्यान्वये कारवाई करण्यात येत आहे, असे उप आयुक्त पवार यांनी कळविले आहे.