कल्याण रेल्वे स्थानकात दोघांवर धारदार शस्त्राने हल्ला…
कल्याण – कल्याण रेल्वे स्थानकात दोघांवर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आल्याची घटना घडली असून, सदर प्रकरणी कल्याण जीआरपी पोलिसांनी हल्ला करणाऱ्यास अटक केली आहे. अरुण कांबळे असे याचे नाव आहे. मित्राच्या बायकोला का बघतोय? असा जाब विचारल्याने अरुणने हा हल्ला केला.
याबाबत वृत्त असे आहे कि, कल्याण रेल्वेस्टेशनवर असलेल्या रेल्वे बुकिंग ऑफिस बाहेर रात्री साडे बारा वाजण्याच्या सुमारास काही जण उभे होते. तेव्हा अरुण हा एका महिलेला सातत्याने बघत होता. हे बघून दिवा खेतकर या तरुणाने अरुणाला तू माझ्या मित्राच्या बायकोला का बघतोय? असे विचारले असता त्याने आपल्या जवळ असलेल्या धारदार शस्त्राने दिवा याच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात दिवाच्या मानेवर जखमा झाल्या. त्यानंतर दिवाला वाचवण्यासाठी गेलेल्या राजूवर देखील अरुणने हल्ला केला.
दरम्यान, याप्रकरणी अरुणला पोलिसांनी अटक केली असून, पुढील तपास सुरु आहे.