अतिरिक्त सरकारी अभियोक्ता एसीबीच्या जाळ्यात…

पालघर – पोलीस कर्मचाऱ्याकडून ७ हजार रुपये लाच घेताना पालघर अतिरिक्त सत्र न्यायालयाचे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता वर्ग 1, यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पालघर यांनी रंगेहाथ पकडले. सुनिल सावंत असे या अतिरिक्त सरकारी अभियोक्त्याचे नाव आहे.
याबाबत वृत्त असे आहे कि, पालघर जिल्हा पोलीस आस्थापनेवर पोलीस नाईक या पदावर काम करत असलेले तक्रारदार यांच्याविरुद्ध सन २०१५ मध्ये तारापूर पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर 3/15 कलम 376 भादंवि प्रमाणे गुन्हा दाखल होता. अतिरिक्त सत्र न्यायालय पालघर या न्यायालयात या गुन्ह्याची सुनावणी होऊन जून २०२३ मध्ये न्यायालयाने तक्रारदार यांना निर्दोष मुक्त केले. त्यानंतर तक्रारदार यांनी पालघर जिल्हा पोलीस आस्थापनेकडे त्यांच्या पदोन्नती बाबत अर्ज केला होता.
पोलीस अधीक्षक, पालघर, कार्यालयाकडून अतिरिक्त सरकारी अभियोक्ता, पालघर, यांच्याकडे पत्रव्यवहार करून तक्रारदार निर्दोष सुटलेल्या खटल्याबाबत सद्यस्थिती अहवाल मागविण्यात आला होता. तो अहवाल पोलीस अधीक्षक पालघर कार्यालयाकडे सादर करण्याकरता अतिरिक्त सरकारी अभियोक्ता सुनिल सावंत यांनी तक्रारदार यांच्याकडे १०,०००/- रुपयाच्या लाचेची मागणी करून तडजोडीअंती ७०००/- रुपये लाचेची रक्कम घेताना सावंत यांना एसीबीने रंगेहाथ पकडले.