आरोग्य विभागात साडे सहा हजार कोटींचा घोटाळा – रोहित पवार

पुणे – आरोग्य विभागात साडेसहा हजार कोटींचा घोटाळा झाला असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवारांनी केला आहे. आरोग्य विभागाने रुग्णवाहिका पुरवठा करणाऱ्या सुमित व बीव्हीजी या कंपनीला नियमबाह्य पद्धतीने टेंडर दिले. त्याद्वारे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी साडे सहा हजार कोटी रुपयांचा घोटाळा केला आहे, असा आरोप आमदार रोहित पवार यांनी केला.
आज आपल्या सर्वांना मी एका खेकड्याची स्टोरी सांगणार आहे, असे म्हणत यांनी पत्रकार परिषदेला सुरुवात केली. एका खेकड्याची स्टोरी सांगणार आहे.खेकडा वळवळ करतो. धरण पोखरतो. बिळात जावून बसतो.. लोकांचं लक्ष कमी झालं की पुन्हा बाहेर येतो. असे म्हणत रुग्णवाहिकेबद्दलच्या घोटाळ्याबद्दल आज बोलणार असल्याचे रोहित पवार यांनी म्हटले.
रोहित पवार म्हणाले, आरोग्य विभागात साडेसहा हजार कोटींचा घोटाळा झाला याला आरोग्य मंत्री जबाबदार आहेतच एक तर त्यांनी त्यांची खुर्ची सोडावी त्यांचे पद सोडावे, ही फाईल पुढे पास कशी केली. देवेंद्र फडणवीस साहेबांकडे ही फाईल जाते. त्यांनी दुर्लक्ष केलं का? साडेसहा हजार कोटीचा भ्रष्टाचार झालेला आहे कोण जबाबदार आहे? असा प्रश्न आमच्या सगळ्यांचा आहे.
५३९ कोटी रुपये अँब्युलन्सच्या खरेदीच्या नावाखाली खात्यात आले. सुमित फॅसिलिटी ही पिंपरी चिंचवडची कंपनी होती. या कंपनीला अँब्यूलन्स चालविण्याचा अनुभव नव्हता. मात्र तरीही मुख्यमंत्री दावोसला गेल्यावर एका स्पॅनिश कंपनीसोबत या सुमित कंपनीचा करार करण्यात आला. मात्र त्यानंतर बी व्ही जी या कंपनीने हे कंत्राट त्यांना मिळावे म्हणून प्रयत्न सुरु केले. त्यानंतर बी व्ही जी चा देखील समावेश या कंत्राटात करण्यात आला, एका बाजुला बीव्हीजी बाबत अनेक तक्रारी आहेत. अनेक राज्यांत बीव्हीजी ब्लॅक लिस्ट कंपनी आहे. मात्र तरीही या कंपनीला कंत्राट देण्यात आले, असे रोहित पवार म्हणाले.