डोंबिवली – मालकाने केली मजुराची हत्या…

डोंबिवली – शेतघरात काम करणाऱ्या एका शेतमजुराची हत्या त्याच्याच मालकाने साथीदारांसोबत मिळून केली असल्याचे तब्बल ९ महिन्यांनी उघकीस आले आहे. संतोष सरकटे असे या मजुराचे नाव आहे.
सदर प्रकरणी मानपाडा पोलिसांनी शेतघर मालक नितीन पाटील, विजय पाटील आणि अभिषेक लाड यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून, विजय आणि नितीन यांना अटक करण्यात आली आहे. तर अभिषेक फरार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार संतोष सरकटे हे शेतघर मालक नितीन पाटील यांच्या हेदुटणे गावा जवळील शेतघरावर मजूर म्हणून काम करत होते. त्यांच्याकडे शेतघर आवारात पाण्याचे किती टँकर भरले याच्या नोंदी ठेवण्याचे काम होते. त्यावेळी नितीन यांनी संतोष यांच्याकडे आपली बंदूक ठेवण्यास दिली होती. त्यानंतर नितीन यांनी ती बंदुक संतोष यांच्याकडे मागितली परंतु ती बंदूक कुठे ठेवली आहे हे काही संतोषला आठवत नव्हते. त्यानंतर वारंवार विचारूनही संतोष बंदूक देत नसल्याने नितीन पाटील यांनी आपले साथीदार विजय पाटील आणि अभिषेक लाड यांच्यासोबत मिळून संतोष यांना मारहाण करुन गंभीर जखमी केले.
त्यानंतर जखमी संतोष यांना त्यांनी रुग्णालयात दाखल केले. तेथे डाॅक्टरांनी संतोष यांना मयत घोषित केले. त्यानंतर संतोष यांच्या कुटुंबियांच्या इच्छे विरुध्द संतोष यांचा मृतदेह डोंबिवलीतील स्मशानभूमीत नेऊन तेथे आवश्यक कागदपत्र दाखल न करता संतोष यांच्या पार्थिवाचे दहन केले. पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न करून या प्रकरणी कोठेही बोलला तर जीवे ठार मारू अशी धमकी त्यांनी संतोषचा मुलगा सागर आणि त्याच्या कुुटुंबियांना दिली होती. त्यानंतर मानपाडा पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला.
मानपाडा पोलिसांकडून हा तपास कल्याण गुन्हे शाखेकडे गेला होता. मात्र तरीही काही होत नसल्याने संतोषच्या कुटूंबियांनी डोंबिवली सहाय्यक पोलीस आयुक्त सुनिल कुराडे यांच्याकडे याविषयी विनंती केली होती. एसीपी कुराडे यांनी तपास पथकास याचा उलगडा करण्याचे आदेश दिले आणि हत्येचा उलगडा होत पोलिसांनी दोघांना अटक केली.