ठाणे

ठाण्याप्रमाणेच दिवा शहरातही क्लस्टर योजना राबविणार – मुख्यमंत्री शिंदे…

ठाणे – दिवा शहरातील अनधिकृत इमारतींचा शिक्का पुसण्यात येईल. तसेच सुनियोजित शहर म्हणून दिवा शहर विकसित करण्यासाठी ठाण्याप्रमाणेच दिवा शहरातही समूह विकास योजना (क्लस्टर) राबविण्यात येईल, अशी घोषणा करून यासाठीची प्रक्रिया राबविण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महापालिका आयुक्तांना दिले. तसेच दिवामध्ये स्वतंत्र पोलिस ठाण्याच्या इमारतीसाठी 5 कोटींचा निधी देण्याची घोषणाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली.

ठाणे महानगरपालिकेच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या दिवा शहरातील सुमारे 610 कोटींच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते दिवा येथे पार पडला. यावेळी यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, ठाणे महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर, माजी महापौर नरेश म्हस्के, माजी उपमहापौर रमाकांत मढवी यांच्यासह नगरसेवक, पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी दिवा शहरातील धर्मवीर नगर येथे नवीन मुख्य जलवाहिनी लोकार्पण, दिवा आगासन रस्ता येथील आरोग्य केंद्र, दातिवली गावातील व्यायाम शाळा, खुला रंगमंच, साबे गावातील शाळा, देसाई खाडी पुल आदी कामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते झाले.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, दिवा शहराच्या विकासाचा शब्द दिला होता. मोठ्या प्रमाणात निधी देऊन तो शब्द पाळत आहे. यापुढील काळातही दिवा शहराच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी देण्यात येईल. आतापर्यंत या शहरात पाणीपुरवठ्यासाठी 240 कोटी, दिव्यातील रस्त्यांसाठी 132 कोटी, दिवा-आगासन रस्त्यासाठी 63 कोटी, आगरी कोळी वारकरी भवनसाठी 15 कोटी, देसाई खाडीपूलसाठी 67 कोटी, आगासन येथे 100 खाटांच्या रुग्णालयासाठी 58 कोटी, खिडकारी, दातिवली, देसाई तलावच्या सुशोभिकरणासाठी 22 कोटी व खिडकाळेश्वर मंदिराच्या विकासासाठी 13.5 असे एकूण 610 कोटी रुपयांचा निधी दिला आहे. यापुढील काळातही आणखी मोठ्या प्रमाणात निधी देण्यात येईल.

“दिवा शहरातील नागरिकांच्या प्रेमाने मी भारावलो आहे. त्यांच्या प्रेमापुढे आतापर्यंत दिलेला निधीही कमी पडेल. दिवा रेल्वे स्थानकाचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी मा. प्रधानमंत्री व रेल्वे मंत्री यांच्याकडे पाठपुरावा करण्यात येईल. बेतवडे येथे प्रधानमंत्री आवास योजनेतील 2800 घरांचा प्रकल्प उभा राहत आहे. केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री आवास योजनेच्या धर्तीवर राज्यात नमो आवास योजनेतून 10 लाख घरे बांधण्यात येणार आहेत. नागरिकांच्या सुविधांसाठी निधी देण्यात हात आखडता घेणार नाही”, असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

खासदार डॉ. श्रीकांत शिंदे म्हणाले की, दिवा शहराच्या विकासासाठी वेगवेगळ्या माध्यमातून आतापर्यंत हजार कोटींपेक्षा जास्त निधी देण्यात आला आहे. दिवा स्थानकामध्ये कोकणात जाणाऱ्या रेल्वेला थांबा मिळावा, यासाठी पाठपुरावा सुरू आहे. या रेल्वे थांबविण्यासाठी प्लॅटफॉर्मची लांबी वाढवावी लागणार असून त्यासाठी जेवढा निधी लागेल तेवढा देण्यात येईल. तसेच दिव्यात 150 बेडचे सुसज्ज रुग्णालयासाठीची जागा राज्य सरकारकडून मिळाली असून त्याच्या भूसंपादनासाठी 68 कोटी निधी मंजूर झाला आहे. दिवा शहरात स्वतंत्र पोलिस ठाणे असावे तसेच ठाण्याप्रमाणे येथेही क्लस्टर योजना राबवावी, अशी मागणीही खासदार डॉ. शिंदे यांनी यावेळी केली.

यावेळी माजी उपमहापौर रमाकांत मढवी यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी दिवा वासियांतर्फे मुख्यमंत्र्यांचा सत्कार करण्यात आला.

खिडकाळेश्वर मंदिर सुशोभिकरण कामांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन

दिवा येथील खिडकाळेश्वर महादेव मंदिराच्या परिसराचे सुशोभिकरणाचे भूमिपूजन मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते झाले. येथील भूमिपुत्रांचे आराध्य दैवत असलेल्या या मंदिराचे सुशोभिकरणाचे काम लवकर पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी दिले.

यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, महापालिका आयुक्त अभिजित बांगर, खिडकाळेश्वर मंदिर ट्रस्टचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांना आदर्श मानून राज्यकारभार करत आहोत. राज्यातील प्राचीन देवस्थानांचे जतन, संवर्धन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचप्रमाणे गडकोट, किल्ले यांचेही संवर्धन करण्यात येणार आहे. खिडकाळेश्वर मंदिराच्या सुशोभिकरणासाठी जेवढा निधी लागेल तो देण्यात येईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page