ठाणे – संत ज्ञानेश्वर पथावरील रस्ता खचल्याच्या घटनेची चौकशी करण्याचे आयुक्तांचे आदेश…

ठाणे – ठाणे महापालिका उथळसर प्रभाग समिती क्षेत्रांतंर्गत संत ज्ञानेश्वर पथावर तळवलकर जीम समोरचा रस्ता खचला असून या रस्त्याच्या कामांची चौकशी करण्याचे निर्देश आयुक्त अभिजीत बांगर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
संत ज्ञानेश्वर पथाचे यु.टी.डब्ल्यु.टी. पध्दतीने काम मागील 3 वर्षांपूर्वी करण्यात आले होते. मात्र अचानक हा रस्ता खचल्याची घटना घडल्याचे निदर्शनास आले, याची तातडीने दखल घेत सदर रस्त्याची पाहणी करण्यासाठी पथक पाठवून संबंधित घटनेची चौकशी करण्याचे आदेश आयुक्त बांगर यांनी दिले.
सदर रस्त्यांची आय.आय.टीच्या तज्ज्ञांच्या उपस्थित कोअर कटींग करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले, कोअर कटींग केलेल्या काँक्रिटीच्या बॉक्सची strength test आय.आय.टीच्या टीममार्फत करण्याच्या सूचना दिल्या. जेणेकरुन रस्त्याच्या कामाच्या दर्जाबाबत निश्चिती करता येईल. सदर रस्ता हा दोष दायित्व कालावधी (Defect Liability period) दरम्यान असल्याने सदर रस्ता पूर्ववत करण्याचे काम संबंधित ठेकेदारामार्फत त्वरीत करण्यात यावे.
आय.आय.टीच्या टीमकडून अहवाल प्राप्त झाल्यानंतर या रस्त्याच्या कामाच्या दर्जाबाबत त्रुटी आढळल्या तर संबंधित ठेकेदारांवर जबाबदारी निश्चित केली जाईल व संबंधितांवर कारवाई केली जाईल असेही आयुक्त बांगर यांनी नमूद केले.