खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपींना अटक…

गुन्हे शाखा, कक्ष २, पनवेल पोलिसांची यशस्वी कामगिरी…
नवी मुंबई – खुनाच्या गुन्हयातील फरार असलेल्या ४ आरोपींना गुन्हे शाखा, कक्ष २, पनवेल पोलिसांनी अटक केली. इम्रान असीर खान, मोहम्मद सलमान असीर खान, गुफारान असीर खान, मोहम्मद मुजीद इब्रार अली अशी यांची नावे आहेत. देल्हूपुर पोलीस ठाणे, उत्तरप्रदेश येथील खुनाच्या गुन्हयात ते फरार झाले होते. पोलिसांनी त्यांना खारघर येथून अटक केली.
देल्हूपुर पोलीस ठाणे, जिल्हा प्रतापगढ़, राज्य उत्तर प्रदेश वकिल अहमद उर्फ पप्पु यांनी दिलेल्या फिर्यादी गुन्हा नोंद आहे. गुन्हयातील फिर्यादी व आरोपी यांच्यात पुर्वी पासून वाद होते. फिर्यादी यांचा भाऊ रकिब व भाचा असफाक मोटर सायकल वरून देल्हूपुर बाजारातून घरी जात असताना आरोपींनी फिर्यादी यांचा भाऊ व भाचा यांना जिवे ठार मारण्याचे उदद्देशाने त्यांच्या मोटर सायकलला ठोकर मारून त्यांना खाली पडून लाठ्याकाठ्या व लोखंडी सळईने त्यांना मारहाण केली. तसेच आरोपींनी अग्निशस्त्राने जखमींवर फायर करून त्यांना गंभीर स्वरूपाच्या दुखापती केल्या व शिविगाळी करून जिवे ठार मारण्याची धमकी देवून तेथून पळून गेले. दरम्यान सदर गुन्हयातील जखमी रकिब हा उपचारादरम्यान मयत झाला.
सदर गुन्ह्यातील आरोपी हे फरार झाले होते आणि त्यातील ४ आरोपी हे नवी मुंबई परिसरात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी तपास केला असता हे ४ जण सेक्टर ८, खारघर, नवी मुंबई येथे असल्याची माहिती मिळताच सदर ठिकणी सापळा रचून या ४ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. तसेच या आरोपींना देल्हूपुर पोलीस ठाणे, उत्तर प्रदेश, पोलिसांच्या ताब्यात दिले.