मिसिंग लिंकवर दरड कोसळली…

mumbai – मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील नव्याने उभारण्यात आलेल्या मिसिंग लिंकवर दरड कोसळल्याची घटना घडली आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील मिसिंग लिंकच्या क्षेत्रात मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर ही दुर्घटना घडली. भुयाराच्या अगदी शेवटी डोंगराचा प्रचंड मोठा भाग कोसळला. दरडी सोबतच तिथला एक भलामोठा सिमेंटचा पिलर थेट मुख्य रस्त्यावर आडवा झाला आहे. त्यामुळे मुंबईकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) पुलावरील दरड हटविण्यास सुरुवात केली आहे.
दरम्यान, दरड कोसळणे व सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पुणे-मुंबई द्रुतगती मार्ग तसेच जुना मुंबई-पुणे महामार्ग या दोन्ही मार्गांवरील वाहतूक गंभीरपणे प्रभावित झाली आहे. पुणे-मुंबई तसेच मुंबई-पुणे या दोन्ही दिशेची वाहतूक पुढील आदेशापर्यंत पूर्णपणे बंद करण्यात आली आहे.
नागरिकांनी पुढील सूचना मिळेपर्यंत पुणे-मुंबई किंवा मुंबई-पुणे असा प्रवास करू नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. अत्यावश्यक प्रवास असल्यास कृपया प्रशासनाकडून वेळोवेळी जारी करण्यात येणाऱ्या वाहतूकविषयक सूचना व अद्ययावत माहितीनुसारच प्रवास करावा.असेही सांगण्यात आले आहे.



