ठाणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी ११ नोव्हेंबरला आरक्षण सोडत…

thane – ठाणे महानगरपालिकेच्या सन २०२५ मध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी अनुसूचित जाती (महिला), अनुसूचित जमाती (महिला), नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (महिला) व सर्वसाधारण महिला यांच्यासाठी आरक्षण निश्चित करण्याकरीता सोडत काढणे, तसेच आरक्षणाचे प्रारूप प्रसिध्द करण्यासाठीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.
ठाणे महापालिकेच्या राम गणेश गडकरी रंगायतन, मूस रोड, तलावपाळी, ठाणे (प.) या नाट्यगृहात मंगळवार, दि. ११ नोव्हेंबर, २०२५ रोजी सकाळी १०.०० वाजल्यापासून आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे.
प्रवर्गांची रचना
ठाणे महानगरपालिकेत एकूण ३३ प्रभाग आहेत. त्यापैकी, ३२ प्रभाग हे चार सदस्यीय असून ०१ प्रभाग तीन सदस्यीय आहे. या ३३ प्रभागातून एकूण १३१ सदस्य निवडले जाणार आहेत.
या १३१ पैकी, अनुसूचित जातींसाठी ०९ जागा, अनुसूचित जमातींसाठी ०३ जागा, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गासाठी ३५ जागा आणि सर्वसाधारण प्रवर्गासाठी ८४ जागा आहेत.
एकूण १३१ जागांपैकी महिलांसाठी ६६ जागा आरक्षित आहेत. त्यापैकी, अनुसूचित जातींच्या ०५ जागा, अनुसूचित जमातींच्या ०२ जागा, नागरिकांचा मागास प्रवर्गातील १८ जागा आणि सर्वसाधारण प्रर्वगातील ४१ जागा महिलांसाठी राखीव आहेत.
सोडतीचा क्रम
नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग आणि महिलांसाठी राखीव करावयाच्या सर्व प्रवर्गांतील जागांसाठी सोडतीच्या चिठ्ठ्या शालेय विद्यार्थ्यांकडून काढण्यात येतील.
त्यात प्रथम अनुसूचित जातीच्या महिलांसाठी ०५ जागांची सोडत काढण्यात येईल.
नंतर, अनुसूचित जमातीच्या ०२ प्रभागांच्या जागांसाठी सोडत काढली जाईल.
त्यानंतर, नागरिकांच्या मागास प्रर्वगाच्या प्रभागांसाठी ३५ जागा आरक्षित करायच्या असून त्यासाठी सोडत निघेल.
त्यानंतर, नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गातील महिलांच्या १८ जागांसाठी आरक्षण सोडत होईल.
पाठोपाठ सर्वसाधारण (खुल्या) प्रवर्गातील महिलांसाठी राखीव करावयच्या ४१ जागांसाठी आरक्षण सोडत होईल.,
हरकत व सूचनांचा कालावधी
सोमवार, दि. १७ नोव्हेंबर, २०२५ रोजी आरक्षणाचे प्रारुप प्रसिध्द करण्यात येणार आहे. तर, सोमवार, दि. १७ नोव्हेंबर, २०२५ ते सोमवार, दि. २४ नोव्हेंबर, २०२५ ( दुपारी ३.००वाजेपर्यंत ) आरक्षणाबाबत हरकती व सूचना सादर करण्याचा कालावधी आहे.
हरकती व सूचना महानगरपालिका मुख्यालय येथील नागरी सुविधा केंद्र अथवा सर्व संबंधित नऊ प्रभाग समिती कार्यालय येथे सादर कराव्यात, असे आवाहन ठाणे महानगरपालिकेचे प्रशासक तथा आयुक्त सौरभ राव यांनी केले आहे.
दाखल झालेल्या हरकती व सूचना विचारात घेऊन आरक्षणाची अंतिम अधिसूचना प्रसिद्ध करण्यात येईल. ऑनलाईन स्वरुपात व ठाणे महानगरपालिकेच्या इमेलवर पाठवण्यात आलेल्या हरकती व सूचना स्वीकारल्या जाणार नाहीत, असेही महापालिकेच्या निवडणूक विभागाने स्पष्ट केलेले आहे.
तक्ता ०१
- ठाणे महापालिका एकूण जागा – १३१
१. सर्वसाधारण खुला प्रवर्ग – ४३
२. सर्वसाधारण खुला प्रवर्ग (महिला) – ४१
३. नागरिकांचा मागास प्रवर्ग – १७
४. नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) – १८
५. अनुसुचित जाती – ०४
६. अनुसुचित जाती (महिला) – ०५
७. अनुसुचित जमाती – ०१
८. अनुसुचित जमाती (महिला) – ०२.


