दिल्लीतील लाल किल्ला परिसरात भीषण स्फोट!…

new delhi – राजधानी दिल्लीमधील लाल किल्ला परिसरात भीषण स्फोट झाला असल्याची माहिती समोर आली आहे. लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ एक कार उभी होती, त्या कारमध्ये स्फोट झाल्याची माहिती आहे. यात काही जणांचा मृत्यू तर अनेकजण जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
या स्फोटामुळे बाजूला उभ्या असलेल्या दोन कारला देखील आग लागली. चालत्या कारमधील स्फोट एवढा मोठा होता की आजूबाजूच्या इमारतीच्या काचा फुटलेल्या आहेत. या घटनेमुळे लोकांमध्ये भीतीचे आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, लाल किल्ला परिसरातील मेट्रोच्या गेट क्रमांक एकवर हि कार उभी होती. संध्याकाळी ६ वाजून ४५ मिनिटांनी कारमध्ये हा स्फोट झाला. स्फोटाचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही.
दरम्यान, घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या, पोलीस प्रशासन, बॉम्ब शोधक पथक दाखल झाले आहे.



