लाच प्रकरणी सहायक पोलीस निरीक्षकासह शिपाई जाळ्यात…

kalyan – खडकपाडा पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक आणि महात्मा फुले पोलीस ठाण्यातील पोलीस शिपाई हे १ लाख २५ हजार रुपयांच्या लाच प्रकरणात ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकले. तुकाराम जोशी (सहायक पोलीस निरीक्षक) आणि विजय काळे (पोलीस शिपाई) अशी या दोघांची नावे आहेत.
गुन्हयात पूर्ण मदत करणे तसेच लवकर जामीन मिळवून देण्यासाठी सपोनि जोशी यांनी हि लाच घेतली होती. याप्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, सपोनि तुकाराम जोशी आणि पोलीस शिपाई विजय काळे या दोघांना अटक करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांच्या मुलाविरुद्ध खडकपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या प्रकरणात तपासी अधिकारी सपोनि तुकाराम जोशी यांच्या सांगण्यावरून पोशी काळे यांनी गुन्हयात पूर्ण मदत करतो तसेच लवकर जामीन मिळवून देतो असे तक्रारदाराला सांगून जोशी यांच्यासाठी २ लाख रुपये लाचेची मागणी केली. तडजोडीअंती १ लाख २५ हजार रुपये घेण्याचे ठरले.
याबाबत तक्रारदार यांनी ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केल्यानंतर एसीबीने सापळा कारवाईत डॉन बॉस्को हायस्कुलसमोरील डी.बी. चौक, कल्याण प. येथे पोशी काळे यांना तक्रारदारकडून १ लाख २५ हजार रुपये घेताना रंगेहात पकडले. तसेच सपोनि तुकाराम यांना देखील ताब्यात घेतले.
दरम्यान, गुन्ह्याचा पुढील तपास सुरु आहे.



