कल्याण-४ वर्षाच्या मुलीचे अपहरण, हत्या; दोघांना अटक…

kalyan – कल्याणमधील ४ वर्षाच्या मुलीचे अपहरण आणि हत्या केल्याप्रकरणी कोळसेवाडी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. अपर्णा कांबरी आणि प्रथमेश कांबरी अशी या दोघांची नावे असून, अपर्णा हि या मुलीची चुलत मावशी आहे तर प्रथमेश हा तिचा काका आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या मृत मुलीचे वडील हे चोरीच्या गुन्ह्यात तुरुंगात आहेत, आणि तिच्या आईने दुसरा विवाह करून ति या मुलीला तशीच सोडून गेली होती. त्यानंतर या मुलीची चुलत मावशी अपर्णा कांबरी आणि तिचा पती प्रथमेश कांबरी यांनी मुलीची जबाबदारी घेतली.
मात्र या चार वर्षाच्या चिमुरडीला प्राथविधीबाबत समज नसल्याने तसेच तिला वारंवार सांगुन सुधारणा होत नसल्याने या कारणावरून प्रथमेशने तिला मारहाण केली आणि यात तिचा मृत्यू झाला. मृत्यू झाल्यानंतर अपर्णा आणि प्रथमेशने मुलीचा मृतदेह गोणीत ठेवून त्यावर गादी गुंडाळली आणि कर्जत-भिवपुरीतील चिंचवली गावाजवळच्या जंगलात फेकून दिला.
त्यानतंर काही दिवसांनी या मुलीची आत्या ज्योती सातपुते भावाच्या मुलीला माझ्या घरी पाठवा अशी अपर्णाला विनंती करत होती. पण, अपर्णा आणि तिचा पती प्रथमेश कांबरी सातत्यानं टाळाटाळ करत होते. याबाबत ज्योतीला संशय आल्याने तिने कोळसेवाडी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली. ज्योती सातपुते यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला मात्र अपर्णा व प्रथमेश कांबरी हे दोघेही गेल्या सात-आठ महिन्यांपासून लपून बसले होते.
दरम्यान, पोलिसांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे अपर्णा कांबरी आणि प्रथमेश कांबरी या दोघांना आठ महिन्यांनंतर रायगड जिल्ह्यातील चिंचवली गावातून अटक केली.