कल्याण रेल्वे परिसरात पोलिसांच्या नाकावर टिच्चून वेश्या व्यवसाय जोरात…

kalyan – स्मार्ट सिटी कल्याण रेल्वे स्टेशन परिसरात खुलेआम मोठ्या प्रमाणात वेश्या व्यवसाय सुरु आहे. रेल्वे तिकीट काउंटरच्या बाहेर अनेक महिला उभ्या असतात. अश्लील हावभाव करत असतात. त्याचा नाहक त्रास येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना होत आहे. विशेषतः तेथून जाणाऱ्या गृहिणी, लहान मुलं यांना याचा त्रास होत आहे.
(खाली दिलेला सविस्तर व्हिडीओ पहा – १२/०८/२०२५)
रेल्वे स्टेशन परिसरात संतोष, नीलम, अनिल पॅलेस, कल्याण एनएक्स, कल्याण गेस्ट हाऊस या हॉटेलच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावरच जवळजवळ १० ते १५ महिला उभ्या असतात. या महिला रात्री ८ वाजल्या पासून ते पहाटे ४ पर्यंत तेथे उभ्या राहतात आणि वेश्या व्यवसाय करत असतात. तरीही पोलीस प्रशासन कोणतीही कारवाई करताना दिसत नाही.
काही दिवसांपूर्वीच कल्याण पश्चिमेतील ‘अवंतरा’ या स्पा च्या नावाखाली चालणाऱ्या वेश्या व्यवसायावर पोलिसांनी कारवाई केली. मग कल्याण स्टेशन परिसरात उघडपणे राजरोसपणे असा वेश्या व्यवसाय का होत आहे? कोणच्या आशीर्वादाने या महिला वेश्या व्यवसाय करतात? तेथील स्थानिक पोलीस स्टेशन (महात्मा फुले पोलीस स्टेशन) डोळेझाक का करत आहेत असे स्थानिकांचे म्हणणे आहे.
कल्याण परिमंडळ ३ चे उपायुक्त अतुल झेंडे यांनी कल्याण रेल्वे परिसरात कारवाई करून तो परिसर वेश्यामुक्त केला होता. तरीही परत त्याठिकाणी वेश्याव्यवसाय तितक्याच जोमाने सुरु आहे. स्थानिक पोलीस याकडे दुर्लक्ष करत आहेत का असा प्रश्न आता निर्माण झाला आहे.
त्यामुळे कल्याण रेल्वे परिसर पुन्हा वेश्यामुक्त कधी होणार या प्रतीक्षेत स्थानिक आहेत.