वसई-विरार महापालिकेचे माजी आयुक्त अनिलकुमार पवारांना ईडीकडून अटक…

mumbai – वसई-विरारचे माजी पालिका आयुक्त अनिलकुमार पवारांना ईडीकडून अटक करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. अनिल पवारांसह चार जणांना ईडीने अटक केली आहे. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडीकडून हि कारवाई करण्यात आली आहे.
माजी आयुक्त अनिलकुमार पवार , बडतर्फ नगर रचना उपसंचालक वाय.एस. रेड्डी, माजी नगरसेवक सीताराम गुप्ता आणि त्यांचा मुलगा अरुण गुप्ता यांना या प्रकरणात ईडीने अटक केली आहे.
काही दिवसांपूर्वी वसई-विरार महापालिकेतील माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्या घरावर ई़डीने धाड टाकली होती. वसई-विरार परिसरात राखीव ६० एकर भूखंडावर बांधण्यात आलेल्या 41 अनधिकृत इमारती प्रकरणी झालेल्या भ्रष्टाचारात अनिल कुमार पवार यांची ईडीने चौकशी केली.
अनिलकुमार पवार व त्यांच्या कुटुंबियांची चौकशी सुरू होती. त्यांच्या पत्नी आणि मुलीला बोलावून चौकशी करण्यात आली. यानंतर अनिलकुमार पवार यांची सपत्नीक चौकशी करत जबाब नोंदवला. अनधिकृत बांधकाम प्रकरणी अनिलकुमार पवार यांनी मोठी भूमिका बजावल्याचा ठपका ईडीने त्यांच्यावर ठेवला. अनिलकुमारांनी प्रति चौरस फूट 20 ते 25 रुपये दराने लाच स्वीकारल्याचं ईडीच्या प्राथमिक तपासात आढळून आले आहे.