दुर्गाडी किल्ल्यासंदर्भात न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल…
kalyan – दुर्गाडी किल्ल्यासंदर्भात कल्याणच्या दिवाणी न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. दुर्गाडी किल्ल्याची जागा ही राज्य शासनाच्या मालकीची आहे, यावर शिक्कामोर्तब करत न्यायालयाने दुर्गाडी किल्ल्यावरील मजलिस ए मुशायरा या संघटनेचा मालकी हक्काचा दावा फेटाळला.
मागील ५० वर्षापासून दुर्गाडी किल्ल्यावर मंदिर की मस्जिद हा दोन धर्मियांमधील दावा कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयात सुरू होता. या किल्ल्यावर मुस्लिम धर्मियांचे प्रार्थनास्थळ असल्याने मुस्लिम समुदायातर्फे मजलिस ए मुशायरा संस्थेने दुर्गाडी किल्ल्याच्या जागेवर मालकी हक्क सांगितला होता.
सुनावणीवेळी न्यायालयाने मजलिस ए मुशायरा संस्थेकडून मुदतबाह्य कालावधीत हा दावा दाखल करण्यात आला आहे, असे सांगत त्यांचा मालकी हक्काचा दावा फेटाळून लावला. तसेच दुर्गाडी किल्ल्याची जागा शासनाच्या मालकी हक्काची असल्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केले.