महाराष्ट्राचे माजी राज्यपाल एस. एम. कृष्णा यांचे निधन…
Bengaluru – महाराष्ट्राचे माजी राज्यपाल आणि कर्नाटकाचे माजी मुख्यमंत्री सोमनहल्ली मल्लैया कृष्णा उर्फ एस. एम. कृष्णा यांचे निधन झाले. वयाच्या ९२ व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. प्रदीर्घ आजारानंतर मंगळवारी पहाटेच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
एस. एम. कृष्णा हे कर्नाटक व देशाच्या राजकारणातील एक सुसंस्कृत व्यक्तिमत्व होते. उच्च विद्याविभूषित असलेले एस. एम. कृष्णा एक अनुभवी संसदपटू होते. बॅरिस्टर नाथ पै यांच्या प्रजा समाजवादी पक्षातर्फे ते पहिल्यांदा लोकसभेवर निवडून आले होते. आपल्या प्रदीर्घ राजकीय वाटचालीत त्यांनी कर्नाटक विधानसभेचे अध्यक्ष, कर्नाटकचे मुख्यमंत्री, महाराष्ट्राचे राज्यपाल व केंद्रीय परराष्ट्र व्यवहार मंत्री म्हणून उल्लेखनीय काम केले.
साहित्य, टेनिस व शास्त्रीय संगीताची आवड असणाऱ्या एस. एम. कृष्णा यांनी राजभवन येथे शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमांचे आयोजन केले. त्यांनी आपल्या कार्यकाळात राज्यपाल पदाची गरिमा जपली. बंगळुरुची ‘सिलीकॉन व्हॅली’ करण्यात त्यांचा मोठा हातभार होता. आयुष्याची पाच दशकं काँग्रेससोबत घालवल्यानंतर त्यांनी भाजपात प्रवेश केला होता.
दरम्यान, त्यांच्या निधनामुळे राजकारणातील एक सुसंकृत व अभिरुचीसंपन्न व्यक्तिमत्व गमावले आहे.