भारतात ४ नवीन कामगार संहिता लागू…

desh – भारतात आजपासून चार नवीन कामगार संहिता लागू झाल्याची घोषणा केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्री मनसुख मंडाविया यांनी केली आहे. केंद्र सरकारने घेतलेल्या या निर्णयाची माहिती केंद्रीय कामगार मंत्री मनसुख मांडविया यांनी एक्सवर दिली.
या कामगार संहितानुसार सर्व कामगारांना वेळेवर किमान वेतनाची हमी मिळणार आहे. युवकांना नियुक्ती पत्र मिळण्याची हमी मिळेल. महिलांना देखील समान कामासाठी समान वेतन आणि सन्मानाची हमी, 40 कोटी कामगारांना सामाजिक सुरक्षेची हमी मिळेल. निश्चित कर्मचाऱ्यांना एका वर्षाच्या कालावधीनंतर ग्रॅच्युईटीची गॅरंटी मिळेल. 40 वर्षांच्यावरील श्रमिकांना दरवर्षी मोफत आरोग्य तपासणीची गॅरंटी मिळेल. ओव्हरटाईम केल्यास दुप्पट वेतनाची गॅरंटी, जोखीम असलेल्या क्षेत्रातील कामगारांना 100 टक्के आरोग्य सुरक्षेची गॅरंटी, आंतरराष्ट्रीय मानकांनुसार श्रमिकांना सामाजिक न्यायाची गॅरंटी मिळेल, असं मनसूख मांडवीय यांनी केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
तसेच हे बदल नसून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रमिकांच्या कल्याणासाठी घेतलेला ऐतिहासिक निर्णय आहे. नव्या सुधारणा आत्मनिर्भर भारताच्या दिशेनं एक महत्त्वाचं पाऊल असून विकसित भारत 2047 चं ध्येय गाठण्यासाठी नवी गती देईल, असं मनसूख मांडवीय म्हणाले.
केंद्र सरकारने आजपासून लागू केलेल्या नवीन कामगार संहितांमध्ये वेतन संहिता (२०१९), औद्योगिक संबंध संहिता (२०२०), सामाजिक सुरक्षा संहिता (२०२०) आणि व्यावसायिक सुरक्षा, आरोग्य आणि कामाच्या परिस्थिती (OSHWC) संहिता (२०२०) या संहिता लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.



