मोबाईल खेचून जबरी चोरी करणारा गजाआड…
Thane – मोबाईल खेचून जबरी चोरी करणाऱ्यास नौपाडा पोलिसांनी अटक केली आहे. अझरूद्दीन मोईनुद्दीन मोमीन असे याचे नाव आहे.
नौपाडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत मोबाईल खेचून जबरी चोरीच्या घटना वारंवार घडत असल्याने त्यानुषंगाने पोलिसांनी तपास करून मिळालेल्या माहितीच्या आधारे एप्रिल महिन्यात फैज वाहीद शेख याला मोटारसायकलसह अटक केली होती. त्याच्याकडे केलेल्या चौकशीत त्याने त्याचा साथीदार अझरूद्दीन मोईनुद्दीन मोमीन याच्यासह मिळून नौपाडा पोलीस ठाणे हद्दीत मोबाईल खेचून जबरी चोरी केल्याचे ४ गुन्हे उघडकीस आले.
त्यानंतर पोलिसांनी आणखी तपास करून १० ऑगस्टला साथीदार अझरूद्दीन मोईनुद्दीन मोमीन याला ठाण्यातील माजीवाडा परिसरात सापळा रचून चोरीचे मोबाईल आणि मोटरसायकलसह अटक केली. तसेच आणखी ६ गुन्हे उघडकीस आणले. सदर प्रकरणी दोघांकडून चोरी केलेले एकूण ५,४०,०००/-रू. किंमतीचे २४ मोबाईल आणि २ मोटारसायकल हस्तगत करण्यात आल्या आहेत.
दरम्यान, अझरूद्दीन माईनुद्दीन मोमीन हा चोरी केलेले मोबाईल मुंबईमधील एका डिलर मार्फत मध्यप्रदेश व तेथून नेपाळ येथे पाठवत असल्याची माहिती तपासात समोर आली असून, गुन्ह्याचा पुढील तपास सुरु आहे.
सदरची यशस्वी कामगिरी पोलीस आयुक्त आषुतोश डुंबरे, सह पोलीस आयुक्त डॉ.ज्ञानेश्वर चव्हाण, अप्पर पोलीस आयुक्त पश्चिम प्रा.विभाग विनायक देशमुख, पोलीस उप आयुक्त,परि.1 सुभाश बुरसे, सहा.पोलीस आयुक्त प्रिया डमाळे नौपाडा विभाग, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय महाजन, पोनि(गुन्हे) शरद कुंभार,पोनि सुनिल तांबे (प्रशासन) यांच्या मार्गदर्शनाखाली तपासी अधिकारी मंगेष भांगे, सहायक पोलीस निरीक्षक, पोउनि दत्तात्रय लोंढे, पोउनि मकानदार,पोहवा गायकवाड,पोहवा पाटील, पोहवा देसाई, पोहवा रांजणे, पोहवा गोलवड, पोहवा तडवी, पोना माळी, पोशि कांगणे, पोशि तिर्थकर यांनी केली आहे.