कसूरदार वाहन चालकांविरोधात ठाणे जिल्ह्यात सर्वाधिक १०३७ खटले दाखल…
कल्याण – कोळशेवाडी वाहतूक उपविभाग कल्याण पूर्वचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन सांडभोर यांच्या कोर्ट टीमने लोक अदालतच्या अनुषंगाने कसूरदार वाहन चालकांविरोधात ठाणे जिल्ह्यात सर्वाधिक खटले 1037 एवढे दाखल करून, एकूण 10,62,850/- (अक्षरी दहा लाख बासष्ट हजार आठशे पन्नास) रुपयांचा भरणा न्यायालयात केला आहे.
पोलीस उप आयुक्त डॉक्टर विनयकुमार राठोड, वाहतूक विभाग ठाणे शहर यांच्या आदेशान्वये व सहाय्यक पोलीस आयुक्त संजय साबळे, कल्याण वाहतूक विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली कोळशेवाडी वाहतूक उपविभाग कल्याण पूर्वचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन सांडभोर यांच्या कोर्ट टीमने हि कामगिरी केली असून, याबाबत सहाय्यक पोलीस आयुक्त, संजय साबळे कल्याण वाहतूक विभाग यांनी कोळशेवाडी वाहतूक उपविभाग कल्याण पूर्वच्या सर्व कोर्ट टीमचे अधिकारी, अंमलदार यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला तसेच यापुढे देखील अशाच प्रकारे चांगली कामगिरी करण्यास प्रोत्साहित केले.
दरम्यान, लोक आदालतमध्ये नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने त्यांच्या वाहनांवर प्रलंबित दंड सवलतीसह भरून आपल्या वाहनावर होणारी कायदेशीर कारवाई टाळावी असे आवाहन सहाय्यक पोलीस आयुक्त, संजय साबळे यांनी नागरिकांना केले आहे.