डोंबिवलीत पाच जणांवर खंडणीचा गुन्हा दाखल…
Dombivli – एका बांधकाम व्यवसायिकाकडून खंडणी स्वरूपात ४ सदनिका आणि ४१ लाख रुपये जबरदस्तीने घेणाऱ्या ५ जणांविरुद्ध खंडणी विरोधी पथकाने विष्णुनगर पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे.
यामध्ये १ केडीएमसी कर्मचारी, त्याचे ३ साथीदार आणि एका माहिती कार्यकर्त्याचा समावेश असून, विनोद मनोहर लकेश्री (केडीएमसी कर्मचारी), प्रशांत शिंदे, विलास शंभरकर, परेश शहा आणि महेश दत्तात्रय निंबाळकर (निर्भय बनो संस्थेचा माहिती कार्यकर्ता) अशी यांची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, डोंबिवलीतील बांधकाम व्यवसायिक प्रफुल्ल गोरे यांचे डोंबिवलीत डिसेंबर २०१८ पासून कुंभारखाणपाडा, देसलेपाडा, कोपर रस्ता, गोग्रासवाडी भागात इमारत बांधकाम प्रकल्प सुरू होते. या कालावधीत या आरोपींनी विकासक प्रफुल्ल गोरे यांचे प्रकल्प अनधिकृत आहेत. ते तोडण्यात यावेत म्हणून पालिका कार्यालये, शासकीय कार्यालयांमध्ये तक्रारी केल्या. या बांधकामांची छायाचित्रे समाज माध्यमांवर सामायिक करून या गृहप्रकल्पांमध्ये कोणी घर घेऊ नये म्हणून विकासकाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला. आणि या गृहप्रकल्पांच्या तक्रारी मागे घेण्यासाठी आरोपींनी प्रफुल्ल गोरे यांच्याकडून एकूण ४१ लाख रूपये आणि डोंबिवली येथील गृहप्रकल्पातील चार सदनिका खंडणी स्वरुपात जबरदस्तीने घेतल्या.
सदरबाबत बांधकाम व्यवसायिक प्रफुल्ल गोरे यांनी दिलेल्या तक्रारीवरून ठाणे येथील खंडणी विरोधी पथकाचे साहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण गोरे यांनी गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, या गुन्ह्यातील लकेश्री आणि त्याचे ३ साथीदार फरार असून खंडणी विरोधी पथक त्यांचा शोध घेत आहे.