७ लाखाची लाच मागणाऱ्या पोलीस हवालदारावर गुन्हा दाखल…
कल्याण – सात लाख रुपयांची लाच मागणाऱ्या आणि तडजोडीअंती पाच लाख रुपये लाच स्वीकारण्यास तयार झालेल्या कल्याण मधील महात्मा फुले पोलीस ठाण्यातील हवालदार सुचित निवृत्ती टिकेकर यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या ठाणे पथकाने भ्रष्टाचार प्रतिबंंधक कायद्याने गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रादार यांच्या मित्राच्या मेहुण्याविरुद्ध महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यांमध्ये तक्रारदार यांच्या मित्रास आरोपी न करण्यासाठी सुचित टिकेकर यांनी तक्रारदार यांच्याकडे ७ लाख रुपयांची मागणी केल्याबाबत तक्रादार यांनी एसीबीत तक्रार दिली होती.
सदर तक्रारीच्या अनुषंगाने केलेल्या पडताळणी कारवाईत सुचित टिकेकर यांनी तक्रारदार यांच्या मित्रास गुन्ह्यात आरोपी न करण्यासाठी तक्रारदार यांच्याकडे तडजोडीअंती ५ लाख रुपये लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाल्याने एसीबीने सुचित टिकेकर यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.