अवैध हत्यारांचा साठा जप्त; दोघांना अटक…
ठाणे – शिळ डायघर पोलीस ठाण्याच्या हद्दीत नाका बंदी दरम्यान, शिळ डायघर पोलिसांनी अवैध हत्यारांचा साठा जप्त करून दोघांना अटक केली. तसेच त्यांच्याकडून ३ रिक्षा देखील हस्तगत केल्या. गौरव उर्फ बाल्या वाघे आणि अरबाज पठाण अशी या दोघांची नावे आहेत.
शिळफाटयावर पोलिसांची नाका बंदी सुरु असताना मुंब्रा पनवेल रोडने मुंब्र्याच्या दिशेने भरधाव वेगात येत असलेली एक रिक्षा पोलिसांनी पाहिली. ती रिक्षा पोलिसांनी थांबवून त्या रिक्षातील दोघांची चौकशी करून अंगझडती घेतली असता १ लोखंडी कोयता, १ मोबाईल, २ लोखंडी तलवार मिळून आले. तसेच सदरची रिक्षा देखील त्यांनी अभयनगर परिसरातून चोरी केली असल्याचे सांगितले.
सदर प्रकरणी या दोघांवर शिळ डायघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांना अटक करण्यात आली. तसेच चौकशीदरम्यान अरबाजकडून २ रिक्षा हस्तगत करण्यात आल्या आणि गौरवच्या घरातून ७ वेगवेगळ्या वर्णनाची तलवार, सुरा, कोयता अशी हत्यारे जप्त करण्यात आली.