भेसळीच्या संशयावरून पनीर, खवासह सुमारे 10 लाख 47 हजाराचा साठा जप्त…

ठाणे – अन्न व औषध प्रशासनास प्राप्त गोपनीय माहितीच्या आधारे प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी महापे एमआयडीसी मधील मे. भास्कर डेअरी (सर्व्हे नं.62/1, जीटीएल कंपनीजवळ, एमआय.डी.सी.महापे, नवी मुंबई) येथे अन्न सुरक्षा व मानदे कायदा 2006 अंतर्गत तपासणी केली असता त्या ठिकाणी पनीर तसेच खवा हे अन्नपदार्थ उत्पादित केले जात असल्याचे आढळून आले. भेसळ होत असल्याच्या संशयावरून हा पदार्थ व भेसळीसाठी लागणारे पदार्थ असा एकूण 10 लाख 47 हजार 294 रुपये किंमतीचा साठा जप्त करण्यात आला असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाच्या अन्न विभागाने कळविली आहे.
भास्कर डेअरी या आस्थापनेच्या ठिकाणी पनीर व ‘खवा’ बनविण्यासाठी रिफाइन्ड पामोलिन तेल ग्लिसरॉल मोनोस्टीयरेट या पदार्थांचा भेसळीसाठी वापर होत असल्याचे आढळले. सदरचा साठा हा अन्न सुरक्षा व मानदे कायद्यातील तरतुदींचा भंग करणारा असल्याचे आढळून आले. या आस्थापनेतून पनीर, खवा, भेसळकारी पदार्थ व इतर असे एकूण 10 अन्नपदार्थांचे नमुने विश्लेषणासाठी घेण्यात आलेले आहेत. हे 10 नमुने प्रयोगशाळेला पाठविण्यात आले असून अन्न नमुन्यांचे अहवाल प्रलंबित असून अहवाल प्राप्त होताच पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे प्रशासनाच्या वतीने कळविण्यात आले आहे.
अन्न व औषध प्रशासन विभागाचे मंत्री धर्मराव बाबा अत्राम यांनी अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांच्या बैठका घेवून अन्न पदार्थाच्या भेसळीच्या अनुषंगाने कडक कारवाई घेण्याचे आदेश नुकतेच दिलेले होते. त्यानुसार अन्न प्रशासनाचे आयुक्त अभिमन्यू काळे यांच्या निर्देशानुसार सह आयुक्त (दक्षता) समाधान पवार व कोकण विभागाचे सह आयुक्त सुरेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक आयुक्त (दक्षता/गुप्तवार्ता) उल्हास इंगवले, अन्न सुरक्षा अधिकारी मिलिंद महांगडे, निलेश विशे, अरविंदकुमार खडके, हर्षा येवले व इंद्रजीत चिलवंते यांच्या पथकाने नवी मुंबईत ही कारवाई केली आहे.